सोलापूर जनता बँकेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाची सांगता
कृषी आणि औद्योगिक विकास झाल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. देशात अजूनही एक कोटी लोक सायकल रिक्षा खेचतात. म्हणजे माणूस माणसाला खेचतो. हे अमानवीय आहे. ही अवस्था दूर करायची असेल तर सर्वागीण विकास साधावाच लागणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सोलापूर जनता सहकारी मल्टिस्टेट बँकेच्या सुवर्ण महोत्सवाचा सांगता सोहळा गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दुपारी संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजिलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्य विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे होते. याप्रसंगी व्यासपीठावर सहकार भारतीचे अध्यक्ष ज्योतींद्रभाई मेहता, खासदार शरद बनसोडे, आमदार सुभाष देशमुख आदी उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष किशोर देशपांडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
सहकार क्षेत्र वरचेवर खालावत जात असून केंद्र सरकारमध्येही सहकाराविषयी चांगले बोलले जात नाही, याकडे लक्ष वेधत गडकरी पुढे म्हणाले, कठीण काळातून चाललेल्या बँकिग क्षेत्राला सावरण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करावे लागतील. जपानमध्ये बँकेत शंभर रुपयांची ठेव ठेवली तर त्याहून दुप्पट रक्कम मिळत नाही तर ९९ रुपये मिळतात. कर्ज थकबाकी प्रचंड वाढत चालल्यामुळे बँका अडचणीत आल्या आहेत. कर्ज थकबाकीचा विचार करताना जे सराईत थकबाकीदार आहेत, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलाच पाहिजे. परंतु ज्यांची थकबाकी भरण्याची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु केवळ अडचणी आहेत, अशा थकबाकीदारांना मदत करावी लागेल, अशी सूचना गडकरी यांनी केली.
देशाच्या औद्योगिक व कृषी विकासाच्या मुद्दय़ावर भाष्य करताना ते म्हणाले, कृषी व औद्योगिक विकास करताना उत्पादन खर्च आणि विक्रीमूल्याचा योग्य विचार होणे आवश्यक आहे. वस्रोद्योगाची परिस्थिती विचारात घेतली तर कापूस विदर्भात पिकतो आणि तिकडे दूर लुधियानात बनियान तयार होते. यात होणारा उत्पादन खर्च लक्षात घेतला तर आम्ही अशा मालाची निर्यात कशी करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेवटी आíथक प्रगतीमुळे सामाजिक स्वास्थ्य लाभते. सोलापूर जनता बँकेने गेल्या वर्षभरात २८०० कोटींचा व्यवसाय केला. यात व्यवसायापेक्षा सामाजिक विकास महत्त्वाचा आहे. बँकांच्या माध्यमातून गोरगरीब वर्गाला आधार मिळाला पाहिजे. सोलापूर जनता बँकेने सामान्य गोरगरिबांना मदत करताना विश्वार्हताही जपली, हे अधिक महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत गडकरी यांनी बँकेच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी बँकेने काढलेल्या जनसुवर्णदीप या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन गडकरी यांनी केले. तर बँकेच्यावतीने लोकमंगल अन्नपूर्ण योजनेसाठी एक लाख रुपयांची मदत विधानसभा सभापती बागडे यांच्या हस्ते देण्यात आली. लोकमंगल संस्थेचे अविनाश महागावकर यांनी मदतीचा धनादेश स्वीकारला. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील कण्हेरवाडी (ता. कळंब) या दुष्काळग्रस्त गावासाठी शुध्द पाणीपुरवठा होण्यासाठी जार वितरित करण्यात आले.