शेवगाव येथील अरूण लांडे यांच्या खून प्रकरणात गेल्या अडीच वर्षांपासून कोठडीत असलेला नगर येथील काँग्रेसचा तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याने दाखल केलेला तेरावा जामीन अर्ज नाशिक येथील जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळला. हा खटला आता नगरहून नाशिक न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे.
लांडे याचा खून प्रकरणी कोतकर व त्याची तीन मुले यांच्याविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल असून या प्रकरणात दि. १६ सप्टेंबर ११ पासून भानुदास कोतकर कोठडीत आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा कोतकरचे व्याही शिवाजी कर्डिले हेही या गुन्ह्य़ात आरोपी आहे. ते व भानुदास कोतकर याची मुले माजी महापौर संदीप याच्यासह अन्य तिगांना मागेच जमीन मंजूर झाला आहे, मात्र संदीपसह त्याच्या भवंडांना जिल्हाबंदी आहे.
कोतकरच्याच अर्जानुसार हा खटला दि. ३ मार्च १४ ला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग झाला असून येथेच पुढील कार्यवाही होणार आहे. हा खटला नाशिकला वर्ग होताच कोतकर याने तेथे जामीन अर्ज दाखल केला होता. नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्यासमोर गेल्या दि. १५ ला या अर्जावर सुनावणी झाली. त्याचा निर्णय न्यायालयाने बुधवारी दिला. कोतकर याचा हा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सरकारच्या वतीने तेथील सहायक जिल्हा सरकारी वकील एस. पी. माने यांनी काम पाहिले.
कोतकरचा हा आत्तापर्यंतच तेरावा जामीन अर्ज होता. उच्च न्यायालयानेही त्याचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. या खटल्यातीन मूळ फिर्यादी यांनी या जामीन अर्जावर त्यांचे २५ पानी म्हणणे न्यायालवयात सादर केले असून त्याला जामीन देऊ नये अशी मागणी केली होती. सरकारी वकिलांनी न्यायालया बदलेले तरही मूळ परिस्थिती बदलत नाही, त्यामुळे कोतकर याला जामीन देऊ नये अशी मागणी या सुनावणी दरम्यान केली.