शरद पवारसाहेब फसवाफसवी करू नका असे मी भेटीदरम्यान बोललो असे उदयनराजे यांनी म्हटलं. मात्र आमच्यात असं काही बोलणंच झालं नाही असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. तुम्हाला ते काय म्हटलेत माहित नाही पण आमच्यात असा काही विषयच झाला नाही. पक्षाकडून उदयनराजेंना तिकिट दिलं जाणार नाही अशी चर्चा आहे असा याबाबत काय सांगाल? यावर बोलताना शरद पवार यांनीच पत्रकारांना विचारले की तुमची तशी इच्छा आहे का? आमची अशी काही चर्चा झाली नाही.

उदयनराजे बाहेर येऊन काय म्हटले ते माहित नाही. तुम्ही जो विषय काढताय तो तुमच्या मनात आहे का? असे त्यांनी विचारले आहे. उदयनराजेंनी मला वेळ मागितली आहे मी त्यांना भेटणार आहे वेळ दिली आहे. पक्षाच्या आमदारांनी तुम्हाला काही नाव सुचवले आहे का? यावर शरद पवार म्हटले की अद्याप यासंदर्भातली चर्चा नाही आमच्या भेटी व्हायच्या आहेत. राष्ट्रवादीतील दोन्ही तिन्ही राजेंमध्ये जो टोकाचा संघर्ष सुरु आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता असं विचारण्यात आलं तेव्हा शरद पवार म्हटले, समज गैरसमज असतात. पण आमचं काम स्मुथली होतं. भाकरी करपली असं वाटतंय का हा प्रश्न एका पत्रकाराने विचारला तेव्हा मला असे काही वाटत नसून आम्ही अजून तव्यापर्यंत गेलोच नाही असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. ज्यामुळे एकच हशा पिकला.

आज सकाळी जेव्हा उदयन राजे यांनी शरद पवारांची भेट घेतली तेव्हा त्यांनी बाहेर आल्यावर असे सांगितले की हो आमची भेट झाली. त्यात फसवाफसवी करू नका असे आपण पवारांना सांगितले आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे आणखी आपण काय बोलणार असे उदयनराजे म्हटले होते. मात्र आता शरद पवारांनी हे सगळे बोलणे नाकारले आहे. त्यामुळे उदयनराजे जे काही म्हटले ते का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.