सांगलीतील संजयनगरमधील एका तीन महिन्याच्या मुलाला फरपटत ओढून नेण्याचा प्रयत्न भटक्या कुत्र्यांनी केला. रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात येताच दक्ष नागरिकांनी मुलाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले असले तरी यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथानपणा पुन्हा समोर आला. गेल्या महिन्यात एका सहा वर्षांच्या मुलीचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे.
संजयनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या अभंग लोखंडे या तीन महिन्याच्या घरात झोपलेल्या बाळाला भटक्या कुत्र्यांनी घरातून ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मुलाच्या ओरडण्याने पालकांचे लक्ष गेल्याने आरडाओरडा करून या भटक्या कुत्र्यांच्या टोळीला हुसकावून लावण्यात आले आणि मुलाला सोडविण्यात आले.
ही घटना समजताच शहर सुधार समितीचे अ‍ॅड. अमित िशदे, अ‍ॅड. राजाराम यमगर, मुनीर मुल्ला आदींनी मुलाच्या घरी जाउन चौकशी केली. या मुलावर उपचार करण्यात आले असून प्रकृती चांगली आहे. मात्र महापालिकेचे आरोग्य अधिकारी याच परिसरात वास्तव्यास असूनही भटक्या कुत्र्यांची समस्या त्यांना का जाणवू नये असा सवाल त्यांनी केला. गेल्या महिन्यात सुंदरी भारती या सहा वर्षांच्या मुलीचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी जाऊनही पालिका प्रशासन अद्याप ढिम्म असल्याचा आरोप त्यांनी केला.