‘महाराष्ट्रात दरवर्षी शेकडो साहित्य संमेलने होतात. तरीही प्रकाशकाला पाचशे रुपयाचे एक पुस्तके विकणे अवघड होऊन बसले आहे’, अशी खंत व्यक्त करतानाच ‘प्रत्येक संमेलनाला पैशांची गरज असते. त्यासाठी राजकारण्यांकडून पैसा घेणे गैर नाही’, अशी स्पष्टोक्ती अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी विरार येथे केली.

साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, वसई-विरार शहर महापालिका ग्रंथालय विभाग आणि विवा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी विरार येथील विवा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या ‘साहित्य जल्लोष’चे उद्घाटन गज्वी यांच्या हस्ते सकाळी झाले. यावेळी बोलताना राजकारणातून पैसे घेतल्याशिवाय संमेलने होऊ  शकत नाहीत, असे स्पष्ट करतानाच यापुढे लग्नकार्य, वाढदिवस, निरोप समारंभ वा तत्सम कार्यक्रमांच्या वेळी पुस्तके भेट दिली तरच साहित्य, साहित्यिक, वाचक, प्रकाशक आणि भाषाही जगेल, असेही गज्वी यांनी स्पष्ट केले. ‘केवळ मनोरंजन हा साहित्य निर्मितीचा मूळ हेतू नसतो. व्यापक प्रबोधन आणि लोकशिक्षण आणि भाषा संवर्धन असा व्यापक विचार साहित्य निर्मितीच्या मुळाशी असतो. वैश्विक हेतू असणारेच साहित्य टिकते.  इंग्रजी ही एकमेव परदेशी भाषा नाही. आता जर्मन, फ्रेंच, रशियन भाषा सुद्धा आपण शिकल्या पाहिजेत. त्या भाषांमधील कसदार साहित्य मराठीत आले पाहिजे. यामुळे  मराठी भाषा अधिक समृद्ध व वैश्विक होईल, असा विश्वासही त्यांनी  व्यक्त केला.

तृतीयपंथीयांच्या वेदनांना वाचा

दुसऱ्या सत्रातील ’नाते वेदनेचे’ या विषयावरील परिसंवादात फासेफारधी आणि तृतीयपंथीयांच्या वेदनांना वक्त्यांनी वाचा फोडली गेली. फासेपारधी समाजातील बेवारस मुलांची व्यवस्थेकडून होत असलेली ससेहोलपट फासेपारधी आश्रम शाळेचे संस्थापक मतीन भोसले यांनी उपस्थितांपुढे मांडली.

लक्ष्मी नावाच्या तृतीयपंथीयाच्या वेदना लेखिका वैशाली रोडे यांनी व्यक्त केल्या.  समाजाने हिणवलेले हे तृतीयपंथी आता शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत,  अशी माहिती रोडे यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

‘आव्हानांकडे संधी म्हणून पाहा’

तिसऱ्य्या सत्रात ‘आव्हाने माध्यमांची’ या विषयावर परिसंवाद रंगला. यामध्ये  ज्येष्ठ पत्रकार,  माजी खासदार भारतकुमार राऊत, लेखिका अरुणा जागळेकर, नितीन आरेकर, संगीतदिग्दर्शक राहुल रानडे, वीरेन प्रधान, अभिनेत्री जुई गडकरी आदींनी सहभाग घेतला. ‘आव्हान म्हणजे संकट नाही. स्वत:मधील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी ती आलेली संधी असते. आव्हान म्हणजे एकप्रकारचे आवाहन असते. त्यामुळे जीवनातील प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून पहायला हवे’, असे प्रतिपादन भारतकुमार राऊत यांनी केले. हा धागा पकडून सहभागी इतर वक्त्यांनीही आपापल्या क्षेत्रातील विविध आव्हानांचा उल्लेख करत त्या आव्हानांना ते कशाप्रकारे सामोरे गेले, आलेल्या प्रत्येक आव्हानांतून त्यांनी स्वत:ला विकसित करण्याची कशी संधी साधली, याची माहिती उपस्थितांना दिली. चौथ्या सत्रातील कविसंमेलनाने या दिवसभराच्या कार्यक्रमाचा समारोप झाला.

‘स्त्रीमुक्ती नव्हे तर पुरुषमुक्तीची गरज’

दरम्यान, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनीही ‘साहित्य जल्लोष’च्या उद्घाटनपर कार्यRमाला उपस्थिती दर्शवली.  पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेत स्त्रीमुक्ती नव्हे तर पुरुषमुक्तीची गरज निर्माण झाली आहे. जगातील सर्व वाद वा संघर्ष हे स्त्रियांमुळे नाही तर पुरुषी अहंकार व सदोष मानसिकतेतून निर्माण झाले आहेत. अंतराळात झेपावताना डॉ. कल्पना चावला यांना समाजाने पंख दिले आहेत. तर असंख्य महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून महिला कुठेही मागे नसतात याचे कायमस्वरूपी उदाहरण घालून दिले असल्याचे फा. दिब्रिटो यांनी यावेळी विचार व्यक्त करताना सांगितले.