07 March 2021

News Flash

तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहार उजेडात आणणाऱ्या गंगणेंना नोटीस

या प्रकरणी आठ दिवसांत बिनशर्त माफी मागा अन्यथा दहा कोटी रुपयांच्या बदनामीचा दावा दाखल करू, असेही नोटिशीत म्हटले आहे.

‘बिनशर्त माफी मागा अन्यथा दहा कोटींचा दावा’!

तुळजाभवानी मंदिराच्या कारभाराचे अनेक वष्रे न झालेले लेखापरीक्षण, देवीचरणी भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान दागिन्यांचा अपहार, तसेच लिलावातील कोटय़वधी रुपयांचा सावळा गोंधळ माहितीच्या अधिकारातून कागदपत्रे मिळवून उजेडात आणणाऱ्या पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांना मंदिर प्रशासनाने वकील नेमून बदनामीचा दावा दाखल करण्याची नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आठ दिवसांत बिनशर्त माफी मागा अन्यथा दहा कोटी रुपयांच्या बदनामीचा दावा दाखल करू, असेही नोटिशीत म्हटले आहे.
मंदिरातील कोटय़वधी रुपयांचे गैरव्यवहार चव्हाटय़ावर आणणाऱ्या गंगणे यांना आठ दिवसांत नोटिशीचे उत्तर द्यावे अन्यथा बिनशर्त माफी मागावी, असे बजावतानाच तसे न केल्यास पुढील दिवाणी व फौजदारी कार्यवाही, तसेच त्याच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी गंगणे यांच्यावर राहील, असेही स्पष्ट केले आहे. नोटिशीचा २५ हजार रुपये खर्च गंगणे यांच्यावर बसेल, असेही नोटिशीत बजावले आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या भावाच्या दुकानातून सत्कार करण्यासाठी आणलेल्या मूर्ती विनानिविदा खरेदी केल्याचा आरोप गंगणे यांनी केला होता. चव्हाण हे आमदार म्हणून विश्वस्त असताना झालेल्या या गरव्यवहारावर गंगणे यांनी बोट ठेवले होते. याकडे नोटिशीत लक्ष वेधण्यात आले. तहसीलदार अशील असल्याचे सांगत अ‍ॅड. विश्वास एल. डोईफोडे यांनी पाठविलेल्या नोटिशीत देवराव तुकाराम चव्हाण यांच्या सोलापूर येथील दुकानातून साहित्य खरेदी केल्याचा आरोप गंगणे यांनी केला होता. मात्र, अशी खरेदी करण्याची प्रक्रिया निविदा पद्धतीने करणे अपेक्षित नाही, असे नोटिशीत म्हटले आहे. दरम्यान, मंदिरातील भ्रष्टाचार उघडकीस आणत असल्यानेच जाणीवपूर्वक नोटीस दिल्याचा आरोप किशोर गंगणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. आतापर्यंत भ्रष्टाचाराचे अनेक दरवाजे बंद केल्यामुळेच मंदिराच्या उत्पन्नात कोटय़वधींची वाढ दिसून आली. गंगणे यांनी वेगवेगळ्या प्रकरणांत दाखल केलेल्या याचिकेमुळेच मंदिरातील गरकारभाराला आळा बसला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींपासून ते दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्यापर्यंत सर्व नेत्यांना सोन्या-चांदीच्या मूर्ती मंदिर प्रशासनाने भेट म्हणून दिल्या. या आशयाचे वृत्त ‘लोकसत्ता’सह वृत्तवाहिन्यांवर देण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 2:19 am

Web Title: notice to gangne in case of tulja bhawani matter
टॅग : Notice
Next Stories
1 विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्व कारणीभूत!
2 कामे पूर्ण, पेमेंट अपूर्ण!
3 कापूस खरेदीला १५ नोव्हेंबरचा मुहूर्त
Just Now!
X