शक्तिशाली आणि हिंसक यात मोठी तफावत आहे. देशाला शक्तिशाली करण्यात काहीच गैर नाही. माणूस असो किंवा प्राणी, शक्तिशाली समुहाची कुरापत काढण्याचे धाडस कोणी करू शकत नाही, हेच अणुबाँबचे महत्व आहे, असे सांगून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी ‘शांती शस्त्र‘(वेपन ऑफ पीस’)असा अणुबाँबचा उल्लेख केला.
सोनई (ता. नेवासे) येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. काकोडकर यांच्यासह इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा शुक्रवारी कृतज्ञता पुरस्काराने गौरव करण्यात आला. या वेळी डॉ. काकोडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख होते. एका लाख रूपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. काकोडकर म्हणाले, ह्लअणुबाँब हे टोकाचेच अस्त्र आहे. मात्र, कुठलेही तंत्रज्ञान उपकारक आणि अपायकारक अशा दोन्ही पध्दतीने उपयोगात आणता येते. याचा अर्थ तंत्रज्ञान वाईट आहे, असे मुळीच नाही. कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर माणसाचा मेंदू कशा पध्दतीने करतो त्यावर त्याचे फायदे-तोटे ठरतात. अणुउर्जेतून केवळ अणुबाँबच तयार होते असे नाही, तर अणुउर्जा आता माणसाच्या आरोग्यापासून विविध उपयुक्त गोष्टींसाठी वरदान ठरली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अणुशक्तीचा वापर प्राधान्याने वीजनिर्मितीसाठी झाला पाहिजे, असे स्पष्ट करून अजून १८ ते २० वर्षांनी म्हणजे सन २०३२ मध्ये वीज निर्मितीची देशातील पारंपारिक सर्व साधने संपलेली असतील आणि विजेची गरज मात्र सहा पटीने वाढलेली असेल. ही विसंगती व त्याचा देशावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता अणुउर्जेशिवाय पर्याय नाही.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारावर देश प्रगतीत मागे पडणार नाही, असा विश्वास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ह्लअज्ञान आणि अनास्था याच दोन गोष्टी देशासमोरील सध्याच्या सर्वात मोठय़ा समस्या आहेत. राष्ट्रीय चारित्र्यात आपण कमी पडतो, त्याचीच देशाला नितांत गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षांपूर्वीच ही गोष्ट ओळखली होती, याचे भान आपण ठेवले पाहिजे. डॉ. प्रकाश आमटे म्हणाले बाबांचे संस्कार आम्ही चौथ्या पिढीत टिकवू शकलो हीच आमच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. आदिवसींच्या अडचणींनीच आमचे जीवन बदलले, आता आदिवसींमध्येही जागरुकता निर्माण होते आहे. समाजातही संवेदनशीलता टिकून आहे, न मागताही आम्हाला कायम मदत मिळत राहिली, हीच आमची उर्जा आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटेंच्या तुलनेत आमच्या आईला फारशी समाजमान्यता मिळाली नाही.
डॉ. सुभाष देवडे यांनी सूत्रसंचलन केले. आमदार शंकरराव गडाख यांनी आभार मानले.

सोनई (ता. नेवासे) येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. काकोडकर यांच्यासह इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा शुक्रवारी कृतज्ञता पुरस्काराने गौरव करण्यात आला. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यावेळी उपस्थित होते. (छाया- किरण दरंदले, सोनई)