एजाजहुसेन मुजावर

सोलापूर शहराबरोबर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातही करोना विषाणू वेगाने पसरू लागला आहे. आता शहर, जिल्ह्य़ात रुग्णसंख्या सुमारे चार हजारांच्या पुढे गेली असून मृतांचा ३४० पर्यंत वाढणारा आकडा चिंतेचा विषय आहे. मागील १५ दिवसांत तर रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने पुन्हा दहा दिवसांच्या संपूर्ण संचारबंदीचा पर्याय निवडला आहे. येत्या १७ ते २६ जुलैपर्यंत शहरासह आसपासच्या पाच तालुक्यांमध्ये संचारबंदीचा कडक अंमल राहणार आहे.

सरकारच्या वतीने विविध उपाय योजूनही करोना विषाणू आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत, तर उलट परिस्थिती उत्तरोत्तर काळजी वाटावी, अशीच दिसते. एकीकडे बाधित रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रशासनात असलेला समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या रुग्णसंख्या व मृतांच्या संख्येबाबत विश्वासार्हतेचा प्रश्न आहे.

१५ दिवसांपूर्वी शहरात प्रशासनातील समन्वयाचा अभाव असल्याचे कारण पुढे करीत मृतांच्या संख्येत ४०ने वाढ करताना, संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीला संबंधित अधिकाऱ्याने समाधानकारक असे काय उत्तर दिले आणि त्याच्या विरुद्ध कोणती कारवाई झाली, हे सारे अजूनही गुलदस्त्यातच आहे. दुसरीकडे आजही मृतांची संख्या निश्चित किती आहे, याची खात्रीपूर्वक माहिती प्रशासनाकडून मिळणे कठीण झाले आहे. करोना मृतांच्या आकडय़ांचा हा खेळ प्रशासनासाठी निश्चितच शोभा देणारा नाही. यातच मृतदेहांचे प्रामुख्याने जेथे दहन होते, ती मोरे स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी ३० वर्षांपूर्वीची जुनी झाली आहे. नवीन विद्युत दाहिनी उभारण्याची प्रक्रिया प्रशासन स्तरावर सुरू झाली असून सर्व सोपस्कार होऊन प्रत्यक्ष नवीन विद्युत दाहिनी उभारण्यास आणखी किमान दोन महिन्यांचा तरी कालावधी लागणार आहे.

सोलापुरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झोपडपट्टय़ांमध्ये मर्यादित होता, परंतु आता करोनाचा प्रसार शहराच्या सर्वच भागांत वाढला आहे. ग्रामीण भागात विशेषत: दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर आदी भागांत एका गावापासून दुसऱ्या गावात करोना विषाणूचा शिरकाव वाढत आहे. रुग्ण शोधणे व चाचण्यांचे प्रमाण वाढल्यास मृत्युदर कमी होऊ शकतो आणि रुग्णांचे संपर्क शोधण्याचे कामही झटपट होऊ शकते. यात कुचराई व्हायला नको, अशा शब्दात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बजावले होते. परंतु आवश्यक उपकरणेच उपलब्ध झाली नाहीत.

प्रत्येक गोष्टींत विलंब..

शहरात वाढती करोना संसर्गित रुग्णसंख्या पाहता आवश्यक उपाययोजना त्या वेळीच हाती घेणे अपेक्षित होते. मात्र प्रत्येक बाबींमध्ये विलंब झाल्याचे दिसून आले आहे. रुग्णांचा वाढणारा आकडा पाहता खासगी रुग्णालयांची मदत घेण्यापासून ते त्यातील व्यवस्था अमलात आणेपर्यंत विलंब झाला आहे. सध्या २२ खासगी रुग्णालयांतील सुमारे ११०० खाटा प्रशासनाने ताब्यात घेतल्या असल्या तरी गरीब व सामान्य करोनाबाधित रुग्णांना खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेणे आवाक्याबाहेरचे ठरले आहे. शासनाने निश्चित केलेले वैद्यकीय शुल्क आकारून उपचार करण्याचे बंधन सहसा पाळले जात नाहीत, अशा तक्रारी मोठय़ा प्रमाणात येत आहेत. प्रशासनाकडून यासंदर्भात केवळ कारवाईचा इशारा देण्यापलीकडे काहीही होत नाही, असाही बाधित रुग्णांच्या नातेवाईकांचा अनुभव आहे.