News Flash

फडणवीसांसोबत काय चर्चा झाली?, छगन भुजबळांनी केला खुलासा; म्हणाले…

... तर आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालीही काम करू, असं देखील छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

ओबीसींसाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत.

राज्यात ओबीसींचे स्थगित झालेल्या राजकीय आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र येत सार्वत्रिक नेतृत्व केले पाहिजे आणि आरक्षण टिकविले पाहीजे, असे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज (गुरूवार) व्यक्त केले. ओबीसींच्या स्थगित झालेल्या राजकीय आरक्षणाप्रश्नी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत भेट घेतली व दोन्ही नेत्यांमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी छगन भुजबळ यांच्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ देखील होते.

ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याची, माझी तयारी असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच, यासाठीचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी जरी केले तरी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू. असे मतही भुजबळ यांनी या भेटीनंतर व्यक्त केले.

छगन भुजबळ यांनी सांगितले की, ”आमचा उद्देश हा ओबीसी आरक्षण टिकावे असा आहे. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना ओबीसींना आरक्षण मिळाले. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार हे त्या खात्याचे मंत्री आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ भूमिका घेत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ओबीसी आरक्षणाच्या पाठीमागे मजबुतीने उभे आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा करण्यासाठी मी गेलो होतो. त्यांचा देखील ओबीसी आरक्षणाला विरोध नाही, त्यामुळे सर्व स्तरातून आरक्षणासाठी प्रयत्न झाले पाहिजे. ओबीसी आरक्षणासाठी इंम्पेरिकल डाटा मिळावा यासाठी कोण कोणते पर्याय आहेत? यावर देखील आमच्यात चर्चा झाली.”

तसेच, ”राज्य सरकार हे केंद्राने इंम्पेरिकल डाटा द्यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. कपील सिब्बल यांच्या माध्यमातून आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहोत. केंद्राने आम्हाला डाटा द्यावा अशी आमची सातत्याने मागणी आहे. मात्र यासाठी वाद विवाद, वितुष्ट बाजूला ठेऊन काम करण्याची गरज असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा शरद पवार हे सातत्याने आरक्षणाच्या पाठीमागे उभे आहेत त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे.”, असे मत देखील छगन भुजबळ यांनी मांडले.

“तुम्ही नेतृत्व करा, मी तुमच्यासोबत काम करेन,” फडणवीसांकडून भुजबळांना आश्वासन

तर, आपण एकत्रितपणे काम करु, त्यात काही अडचण नाही. मी तुमच्यासोबत काम करेन, तुम्ही त्याचं नेतृत्व करा असं आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळांना आजच्या भेटीत दिलं आहे. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सकाळी भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी दोघांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 5:20 pm

Web Title: obc reservation so we will work under the leadership of devendra fadnavis chhagan bhujbal msr 87
टॅग : OBC Reservation
Next Stories
1 वारकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार कान असून बहिऱ्यासारखं वागत आहे – दरेकर
2 VIDEO: पंकजा मुंडेंच्या भाषणाचा नेमका अर्थ काय?
3 ऑक्सिजन मास्क काढू नको सांगितलं म्हणून करोना रुग्णाने केला डॉक्टरवर हल्ला
Just Now!
X