23 February 2019

News Flash

धडक देणाऱ्यानेच रुग्णाला लुटले, उपचाराला विलंब झाल्याने वृद्धाचा मृत्यू

कोल्हापुरात घडलेली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी ठरली.

प्रतिनिधिक छायाचित्र

कोल्हापूर : धडक देऊ न रुग्णाला जखमी करून मदत करण्याच्या आमिषाने रुग्णाची आर्थिक लूट केली. हे कमी म्हणून की काय रुग्णाला उपचाराला नेण्याचे राहिले बाजूला रस्त्यावर मध्येच सोडून पळ  काढला. रुग्णाने बेशुद्धावस्थेत ३-४ तास कसेतरी काढले. उपचार सुरू झाल्यावर सहा दिवसांनंतर जगाचा निरोप घेतला. नेहमीच मदतीसाठी पुढे असणाऱ्या कोल्हापुरात घडलेली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी ठरली.

तो दिवस होता १० जुलैचा. सरिता सूर्यवंशी यांचे वडील शंकरराव रामचंद्र मोरे (वय ७७, रा.सुर्वेनगर) हे टिंबर मार्केट येथून काम संपवून आपल्या घरी जात होते. शिवाजी पेठेत एका अज्ञात मोटारसायकलने त्यांना मागून जोराची धडक दिली. त्यामध्ये मोरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. पायातूनही रक्तस्राव होऊ लागला. धडक देणाऱ्या व्यक्तीने त्यांना उचलून एका रिक्षात घातले. मदतीसाठी जमलेल्या लोकांना त्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात घेऊन जातो असे सांगितले. नंतर, मात्र त्याच्यातील माणुसकीचा अंत झाला आणि खलप्रवृत्तीने उचल खाल्ली.

बेशुद्ध झालेल्या मोरे यांना त्या तरुणाने उपचाराकरिता न  नेता रंकाळ्याजवळील एका बंद दुकानाजवळ नेले. आपल्या एका मित्राला तेथे बोलावून घेतले. त्याच्या मदतीने त्यांना उचलून दुकानाच्या दारात ठेवले. त्यांच्या खिशातील केएमटीचे ओळखपत्र व काही रक्कम त्याने काढून घेतली. हा प्रसंग पाहणाऱ्या लोकांनी तरुणाकडे चौकशी केली असता त्याने, ‘हे मामा रस्त्यात चक्कर येऊन पडले होते. त्यांचे ओळखपत्र मिळाले आहे.  मी त्यांच्या  घरातील लोकांना बोलावून आणतो’, असा बहाणा केला. तो तरुण आपल्या मित्राच्या मोटार सायकलवरून पसार झाला. यानंतर मोरे तीन तास जखमी अवस्थेत विव्हळत तिथे पडून होते. यावेळी तेथील लोकांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. तब्बल ६ दिवस मोरे यांच्यावर उपचार सुरू होते. योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

तर बाबा वाचले असते

सीपीआरच्या बेवारस विभागात माझे वडील शेवटच्या घटका मोजत होते. अपघातानंतर  त्यांना सीपीआरमध्ये कुणी आणलं, कसं आणलं हे शोधत असतानाच,  सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले. त्यामध्ये त्यांना धडक देणाऱ्या तरुणांचे सारे कुकर्म चित्रित झाले आहे.  दुपारपासून संध्याकाळपर्यंत ते बेशुद्धावस्थेत तिथेच पडून होते. त्यांना लवकर उपचार मिळाले असते तर ते वाचले असते. त्यांना कसलाही आजार नव्हता. ते कायमचे निघून जातील असं वाटलं नव्हतं.. असे सांगताना कन्या  सरिताताईंना गलबलून आले.

First Published on August 9, 2018 3:06 am

Web Title: old man died due to delay in treatment in kolhapur