महाराष्ट्र दिनी आज राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरात मात्र, महाराष्ट्राच्या विभाजनासाठी अर्थात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समितीने केलेल्या या आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
Nagpur: On Maharashtra Foundation Day, Vidarbha Rajya Andolan Samiti members stage protest with a demand of separate Vidarbha state; protesters detained by Police. pic.twitter.com/0WnOcZX3UL
— ANI (@ANI) May 1, 2018
नागपूरमध्ये विदर्भवाद्यांनी केलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर ‘जय विदर्भ’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच आंदोलन समितीने तयार केलेला स्वतंत्र विदर्भाचा झेंडा घेऊन आंदोलक मोर्चात सामील झाले होते. नागपूरच्या विधानभवनावर हा झेंडा लावण्याचा इशारा काल विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. मोर्चा विधानभवनावर आल्यानंतर काही आक्रमक आंदोलक विधानभवनात जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज कारावा लागला. यामध्ये रवी वानखेडे या आंदोलक तरुणाला लाठीचार्जदरम्यान मार बसला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. यावेळी आंदोलकांनी स्वतंत्र विदर्भाची शपथही घेतली.
दरम्यान, विदर्भवाद्यांनी ‘स्वतंत्र विदर्भ’ या विषयावर सोमवारी आयोजित केलेल्या चर्चासत्रात शिवसेनेने गोंधळ घालत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. तसेच कार्यक्रम स्थळावरील खुर्च्यांची मोडतोड केली होती. त्यामुळे काँग्रेस नेते विजय दर्डा आणि राज्याचे माजी अधिवक्ता श्रीहरी अणे यांनी या कार्यक्रमातून काढता पाय घ्यावा लागला होता.
शहरातील प्रेस क्लबमध्ये या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदर्भवादी आणि संयुक्त महाराष्ट्राचे समर्थक आमने-सामने आले. चर्चासत्रादरम्यान, श्रीहरी अणे यांनी जनमत घ्यावे अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली. त्यामुळे सभागृहात उपस्थितांपैकी विदर्भाच्या बाजूने कोण आहे त्यांनी हात वर करून पाठिंबा द्यावा असे आवाहन अणे यांनी करताच सभागृहात उपस्थित शिवसैनिक आक्रमक झाले आणि दोन्ही गटात वाद झाला.
संयुक्त महाराष्ट्रासाठी एकेकाळी राज्यासह दिल्लीत आंदोलने झाली होती. त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुतीही द्यावी लागली. मात्र, त्यानंतर अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रात आजच्या महाराष्ट्र दिनी स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करण्यात आले.