भाजप नेते अमित शहा यांनी काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांची भेट टाळली. मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या शाह यांनी राष्ट्रवादीबाबत योग्य वेळ येताच बोलू असे सांगितले. शिवसेनेबरोबरच्या युतीच्या बाबतीतही आत्ताच काही सांगता येणार नाही असेही शाह म्हणाले.
राष्ट्रवादीशी केलेल्या हातमिळवणीबाबत योग्यवेळी सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. यावर आत्ताच काही बोलता येणार नाही, असे सांगत अधिक भाष्य करणे शहा यांनी टाळले. तसेच शिवसेनेशी पुन्हा महायुती करण्यासाठी दोन्ही पक्षातील सदस्यांनी एकत्र येऊन चर्चा करणे गरजेचे असून, आता याबद्दल काहीच बोलणे उचित नसल्याचे सांगत हा दौरा मी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी केल्याचेही यावेळी शहा यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा आज भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतील अशी शक्यता होती. शहा यांना राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या घरी चहापाण्यासाठी आमंत्रण दिले होते. शहा यांनी त्यांच्याकडे जाण्याचे नियोजनही केले होते. मात्र, राजेंद्र दर्डांची भेट न घेताच अमित शाह दिल्लीकडे रवाना झालेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाचे शुक्रवारी शहा यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यानंतर त्यांनी शनिवारी दौलताबाद येथील हनुमान मंदिरात अभिषेक केला. तसेच भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.