मुसळधार पावसाने  गगनबावडा तालुक्यातील मौजे तिसंगी पैकी टेकवाडी येथे वेतवडे गावाकडे व गगनबावडाकडे जाणाऱ्या मार्गावर दरडीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू आहे.

आज पहाटे मौजे तिसंगी पैकी टेकवाडी येथे वेतवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टेकवाडी बाजूकडील दरडीचा काही भाग रस्त्यावर कोसळला. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. पर्यायी रस्ता असल्यामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा  निर्माण झाला नाही. या घटनेची माहिती सार्वजनिक विभागाला तात्काळ देण्यात आली होती.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी मात्र ही दरड नव्हे तर टेकडीचा छोटासा भाग असल्याचे म्हटले आहे. हा कोसळलेला भाग हटवला असून वाहतूक सुरू झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, स्थानिकांनी याला दरडीचाच भाग असल्याचे म्हटले आहे.