प्रेम व्यक्त करण्यासाठीचा खास दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. मात्र याच दिवसाचं औचित्य साधून एका महाविद्यालयाने त्या महाविद्यालयातील मुलींना एक शपथ दिली आहे. ‘ना प्रेम करणार ना प्रेमविवाह’ तसंच हुंडा न देता लग्न करण्याचा निश्चयही यावेळी मुलींनी केला. हल्ली तरुण वयातच मुलांमध्ये आणि मुलींमध्ये प्रेम प्रकरणांचं प्रमाण वाढलं आहे. तसेच हुंडा घेण्याची पद्धतही वाढली आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन ही शपथ देण्यात आली.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर या ठिकाणी असलेल्या महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी हा निर्धार केला आहे. व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने या विद्यार्थिनींनी प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली.

नेमकं काय म्हणाल्या या विद्यार्थिनी?
‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई वडिलांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. समजा सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी शपथ घेते’