निविदा काढूनही मे आणि जून महिन्यात धान्य वितरण नाही

संदीप आचार्य/रसिका मुळ्ये, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे शालेय पोषण आहार शिजवून देता येणे शक्य नसल्याने कोरडे धान्य वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला; परंतु राज्यातील तब्बल एक कोटी विद्यार्थ्यांना अद्याप मे आणि जून महिन्यातील धान्य वितरित केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्यात एकूण ८६ हजार १६१ पूर्वप्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा असून, त्यांत सुमारे एक कोटी तीन लाख ३५ हजार ८८० विद्यार्थी शिकत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या मुलांना केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत माध्यान्ह भोजन दिले जाते. यासाठी केंद्राकडून तांदूळ उपलब्ध करून देण्यात येत असून, या योजनेसाठी येणाऱ्या खर्चात केंद्राचा हिस्सा ६० टक्के, तर राज्याचा वाटा ४० टक्के आहे.

यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने राज्य सरकारने विद्यार्थ्यांना अन्न शिजवून देण्याऐवजी शाळांमध्ये उपलब्ध असलेले कोरडे धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मार्च महिन्यात शाळांमध्ये उपलब्ध असलेले धान्य मुलांमध्ये समान प्रमाणात वाटप करण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर मे व जून महिन्यात धान्यवाटप करण्यात आले नाही.

केंद्र सरकारने मे व जून या सुट्टीतही करोनास्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनांतर्गत कोरडे धान्य देण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यानुसार केंद्राने सर्व राज्यांना पुरेसा तांदूळसाठा तसेच आपल्या वाटय़ाची अग्रिम रक्कमही पाठवली. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी प्रति दिवस ४ रुपये ४८ पैसे तर उच्च प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना ६ रुपये ७१ पैसेप्रमाणे २५६६ कोटी ९३ लाख रुपये पाठवले. तसेच १२.२३ लाख मेट्रिक टन धान्यही पाठविण्यात आले.

राज्यातील माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मे व जून महिन्यात शाळांना सुट्टी असली तरी अन्नधान्य पुरवठा केला जावा, असे स्पष्टपणे नमूद केले होते. मात्र राज्यात केंद्राच्या आदेशाचे पालन झालेले नाही.

निविदा काढल्या, पण..

आता झोपी गेलेल्या या सरकारला जाग आली असून मे व जून महिन्यातील धान्यपुरवठय़ासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. परंतु अजूनही विद्यार्थ्यांना नुसतेच तांदूळ व डाळ द्यायची की तेल व खिचडीसाठी मीठ-मसाला द्यायचा, यावर मंत्रालयातील उच्चपदस्थांमध्ये काथ्याकूट सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड व शिक्षण सचिव वंदना कृष्णन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.