चंद्रपूर वन विभाग व वाईल्ड लाईफ कंझव्‍‌र्हेशन ट्रस्टने २७०० चौरस किलोमीटर जंगलात ६०० कॅमेरा ट्रॅप लावून सलग चार महिने ११ हजार ट्रॅप नाईट व चार लाख छायाचित्रांमधून केलेल्या वस्तुनिष्ठ अभ्यासाअंती या जिल्ह्य़ात १६० बिबटय़ांची नोंद झाली आहे. राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पांतील बिबटय़ांची ही सर्वाधिक संख्या आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ७२ व बाहेरच्या जंगलात ४८, असे एकूण १२० वाघ असल्याची माहिती याच संस्थेने २५ मे रोजी जाहीर केली होती. पण, बिबटय़ांची संख्या मात्र जाहीर केलेली नव्हती. वाईल्ड लाईफ कंझव्‍‌र्हेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अनिश अंधेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडोबा वगळता बाहेरच्या जंगलात अर्थात, ब्रम्हपुरी, वरोरा, भद्रावती, मध्य चांदा, वनविकास महामंडळ व जिल्ह्य़ातील अन्य जंगलांत १६० बिबटे आढळून आले आहेत. ही आकडेवारी नुकतीच चंद्रपूर वन विभाग व वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयाला सादर करण्यात आली. गेल्या १९ डिसेंबर ते २५ एप्रिल या चार महिन्यांत ब्रम्हपुरीपासून तर वरोरा, कन्हाळगाव, पोंभूर्णा, जुनोना या ताडोबाबाहेरच्या जंगलात प्रत्येक १.५ चौ.कि.मी. अंतरावर एक, असे तब्बल ६०० कॅमेरे लावण्यात आले. अंतिम आकडेवारी काढली असता १६० बिबटय़ांचे वास्तव्य असल्याचे दिसून आहे. यात ब्रम्हपुरी वन विभागाच्या १२०० चौ.कि.मी. जंगलात सर्वाधिक ९६ बिबटे, कन्हाळगाव अभयारण्यात २३, जुनोना जंगल परिसरात १५ बिबटय़ांची नोंद घेण्यात आली.
कॅमेरा ट्रॅपच्या ‘कॅप्चर टू रिकॅप्चर’ या पध्दतीने हा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ.अनिश अंधेरिया, आदित्य जोशी, मिलिंद पारीवकम, विशाल बनसोड, विवेक तुमसरे, अंकूर काली यांनी हा संपूर्ण अभ्यास केला. चंद्रपूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांच्या कल्पनेतूनच वाघ व बिबटय़ांचा तांत्रिक पध्दतीने अभ्यास करून नेमकी आकडेवारी समोर आणण्यात आली. यासाठी त्यांच्यासह चंद्रपूर व ब्रम्हपुरी वन विभागानेही परिश्रम घेतले. २९ जुलैला ‘ग्लोबल टायगर डे’
येत्या २९ जुलैला राज्यात सर्वत्र ‘ग्लोबल टायगर डे’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंत्रालयात या दिवशी एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. यावेळी पुस्तक प्रकाशन, चित्रपट, माहितीपट व छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात वाघ व बिबटय़ांची नेमकी आकडेवारी जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे.