२० हजारांवरून थेट पाच हजार रुपये दर

सोलापूर : गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत उच्च दर्जाच्या कांद्याला विक्रमी स्वरूपात  २० हजारांपर्यंत दर मिळाला होता. नंतर घट होऊन दर नऊ ते दहा हजारांपर्यंत स्थिरावला. आता नवीन वर्षांत मात्र कांदा दर आणखी गडगडला असून गेल्या तीन दिवसांपासून दर्जेदार कांद्याला प्रतिक्विंटल पाच हजारांपर्यंतच दर मिळाला आहे. तर सरासरी दर २३०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. येत्या काही दिवसात कांद्याच्या दरात आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोलापुरात गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत मिळून कांद्याच्या आर्थिक उलाढालीचा आकडा ४११ कोटी रुपये इतका  होता. या दोन महिन्यात १२ लाख ४८ हजार ३४४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्याआधीच्या वर्षी, याच कालावधीत म्हणजे नोव्हेंबर व डिसेंबर-२०१८ मध्ये १४ लाख ३२ हजार ८२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. परंतु त्या वेळी दर कोसळल्यामुळे केवळ ९१ कोटी ८२ लाख ३९ हजार रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षी कांदा दरात मोठी वाढ झाल्याने मागील वर्षांपेक्षा एक लाख ८३ हजार ७३८ क्विंटल कांदा आवक कमी होऊनदेखील आर्थिक उलाढाल मात्र ४११ कोटी ६ लाख ११ हजार ७०० रुपयांपर्यंत झाली. मागील वर्षीची तुलना करता यंदा त्यात ३१९ कोटी २४ लाखांची वाढ झाल्याचे दिसून आले.

तथापि, गेल्या महिन्याच्या अखेरीस कांद्याचा उच्चांकी दर घटत गेल्यानंतर नव्या वर्षांत तर त्यात मोठी घसरण सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात कांद्याला उच्चांकी दर २० हजार रुपये, तर सरासरी दर ६५०० रुपयांपर्यंत मोजण्यात आला होता. डिसेंबरअखेर दर्जेदार कांद्याचा दर नऊ हजार रुपये इतका होता, तर सरासरी दर तीन हजार रुपये होता. परंतु आता त्यात प्रचंड घट होत असून उच्चांकी दर पाच हजार, तर सरासरी दर २३०० रुपये मिळत आहे.

गेल्या तीन दिवसात मिळून सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत ९४ हजार ९१६ क्विंटल नवीन कांद्याची आवक झाली आहे. शुक्रवारी ३३ हजार ३११ क्विंटल कांदा दाखल झाला. येत्या काही दिवसात दर आणखी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.