प्रसेनजीत इंगळे

मकर संक्रांती सण जवळ आला की आकाशात रंगीबेरंगी पतंग उडताना दिसतात. मात्र हे पतंग उडवण्यासाठी पूर्वी वापरण्यात येणाऱ्या चायनीज मांज्याचे पक्षी  बळी ठरत आहेत त्यामुळे  शासनाकडून या मांज्यावर बंदी घालण्यात आली. असे असतानाही विरार तसेच नालासोपारा परिसरात काही ठिकाणी खुलेआम या मांज्याची विक्री सुरू आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही.

करोनाचे सावट जरी असले तरी  बाजारात वेगवेगळे आकार आणि प्रकारचे पतंग आले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मांजेसुद्धा आले आहेत.  छुप्या पद्धतीने बंदी असलेला नायलॉन (चायनीज) मांजासुद्धा बाजारात दाखल झाला आहे. वसई, विरार, नालासोपारामधील अनेक दुकानांत हा मांजा सध्या विकला जात आहे.  संक्रांतीत पंतग उडविण्याच्या आनंदापेक्षा समोरच्याची पतंग कापण्यात पतंगप्रेमींना जास्त आनंद मिळतो, यासाठी चायनीज मांज्याची मागणी होत असते. बंदी असली तरी  जास्त मागणी असल्याने या मांज्याची विक्री विक्रेते करत आहेत. या मांज्यामुळे पक्षी तसेच मानवांनासुद्धा इजा होते यामुळे हा मांजा नागरिकांनी वापरू नये, असे आवाहन विरार पोलिसांनी केले आहे.

संक्रांतीच्या काळात करुणा ट्रस्ट यांच्या वतीने मुंबई आणि वसईत या मांज्यामुळे पक्षी आणि प्राण्यांच्या उपचारासाठी दरवर्षी शिबिरे आयोजित केली जातात. यामध्ये उपचार केलेल्या पक्षी आणि प्राण्यांच्या संख्येवरून ही आकडेवारी काढण्यात येते. या ट्रस्टचे प्राणीमित्र मितेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मागील दोन दिवसांत ७  ते ८  पक्षी आणि १० प्राणी  मांज्याचे शिकार झाले आहेत. यात मांज्याने गळा आणि पंख कापले गेल्याने दोन कबुतरांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गेल्या वर्षी १०८ पक्षी या मांज्याची शिकार झाले होते. त्यात ३५ पक्षी आणि एका कुत्र्याचा जीव गेला होता. चायनीज, नायलॉनचा मांजा हा पक्षी प्राणी तथा मानवालासुद्धा घातक आहे, यामुळे या मांज्याचा वापर करणे टाळावे, असे आवाहन जैन यांनी केले.

या संदर्भात अधिक माहिती घेतली जाईल, तसेच सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या जातील. लवकरच अशा मांज्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.

– संजयकुमार पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त, वसई झोन २