अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधकांनी दिलेल्या आव्हानाला सभागृहात आणि बाहेरही सडेतोड उत्तर देण्याच्या वक्तव्यावरून माफी मागण्यास गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिल्यामुळे विधानसभेचे कामकाज आज सलग दुसऱ्या दिवशी ठप्प झाले. गृहमंत्र्यांच्या वक्तव्यातील आक्षेपार्ह भाग कामकाजातून काढून टाकण्याची ग्वाही देत अध्यक्षांनी या वादावर पडदा टाकला. मात्र सिंचन घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याच्या मागणीवर अडून बसलेल्या विरोधी पक्षाने आज दोन्ही सदनांचे कामकाज रोखले. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या वादातून बाहेर पडलेल्या अजित पवार यांची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे.
 अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ घटनाबाह्य़ असल्याच्या दावा करीत विरोधी पक्षाने गेले दोन दिवस विधानसभेत पवार आणि सरकारचीही कोंडी केली होती. तर आज सिंचन घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करीत विधानसभा आणि परिषदेतही कामकाज रोखले. विधानसभेत भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा मांडला. मात्र तालिका अध्यक्ष नवाब मलिक यांनी हा मुद्दा मांडण्यास फडणवीस आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना परवनगी नाकारली. त्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळातच महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले.  विधानसभेप्रमाणे विधान परिषदेतही सिंचन घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या मुद्दय़ावरून आज सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ झाल्याने कामकाज ठप्प झाले. प्रश्नोत्तराचा तास संपताच विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी हा मुद्दा मांडला. आधी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा करा, मग कामकाज करू, अशी भूमिका विरोधी पक्षाने लावून धरली. तर आधी पटलावरील कामकाज होऊ देत, असे संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. सभागृहात गोंधळ झाल्याने प्रथम दहा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.  दरम्यान, अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्या विरोधकांना सभागृहात आणि बाहेरही सडतोड उत्तर देण्याच्या वक्तव्यावरून गृहमंत्र्यांनी सदनाची माफी मागावी, अशी मागणी करीत विरोधी पक्षांनी आज पुन्हा विधानसभेत गदारोळ केला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षाच्या आसनासमोरील जागेत धाव घेत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. गृहमंत्र्यांच्या धमकीच्या वक्तव्यामुळे आम्ही अस्वस्थ असल्याचे सांगून जोवर गृहमंत्री माफी मागत नाहीत, तोवर कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिला. तर पाटील यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसल्याचे संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. आर.आर. पाटील यांनीही आपण कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसून सदनात कोणालाही धमकावलेले नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे सांगत माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावरून तीन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. शेवटी गृहमंत्र्यांच्या वक्तव्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास ते कामकाजातून वगळण्याची ग्वाही देत अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी या वादावर पडदा टाकला.    

विरोधकांनी सभागृह वेठीस धरल्याचा आबांचा प्रतिहल्ला
सभागृहामध्ये चुकीचे विधान केले नाही त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगून विरोधक विदर्भातील आणि राज्यातील विकास कामांसंदर्भात चर्चा करून ते सोडविण्यापेक्षा सभागृहाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका आर.आर. पाटील यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विधानभवन परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. विरोधकांना सभागृहात काय रस्त्यावरही पाहिजे त्या पद्धतीने उत्तरे देऊ असे विधान केले असले तरी त्यात गैर काही नाही. या विधानात कुठेही धमकी नाही किंवा इशारा नाही. केलेल्या विधानाबाबत सभागृहातील काही विद्वानांशी चर्चा केली असल्यामुळे त्यात गैर काही नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे आबांनी सांगितले.  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनीही जाहीर सभेतून सरकारला रस्त्यावर पाहून घेऊ, अशा इशारा दिला त्यामुळे त्यांच्या विधानावरसुद्धा आक्षेप घेतला पाहिजे. अधिवेशन होऊन तीन दिवस झाले मात्र, विरोधकांची कुठल्याही विषयावर चर्चा करण्याची तयारी नसून केवळ सभागृहात गोंधळ घालणे हा कार्यक्रम ठरवून सभागृहाला वेठीस धरले जात आहे. या गोंधळामुळे विदर्भातील प्रश्न सुटणार नाहीत आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमच्या नावाने बोंबा मारतील. शिवसेनेने अविश्वास ठराव आणला मात्र त्याबाबत भारतीय जनता पक्षाने ठोस भूमिका स्पष्ट केली नाही. विरोधकांमध्ये एकमत नसल्यामुळे केवळ गोंधळाशिवाय त्यांना दुसरे काम नाही. पहिल्या दिवशी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदावरून तर मी सभागृहात माफी मागावी यावरून गोंधळ घातला. विरोधकांनी प्रश्न उपस्थित करावे त्या प्रश्नावर आणि विषयांवर चर्चा करण्याची  तयारी असल्याचे पाटील म्हणाले.