संघ स्वयंसेवक असल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : ‘राज्यपाल हे पद घटनात्मक असतानाही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याची भूमिका उघडपणे मांडली आहे. त्यामुळे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की स्वयंसेवक म्हणून संघाचा कार्यक्रम राबविणारे, अशी शंका उपस्थित करीत विरोधकांनी सोमवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी राज्यपालांच्या अभिभाषणाने प्रारंभ झाला. मात्र, राज्यपाल हे संघ स्वयंसेवक म्हणून वागत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी विद्यमान सरकारच्या काळात प्रथमच राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत शेतकरी कर्जमाफी, दुष्काळ, महाभरती आदी मुद्दय़ांवरून अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचा इशारा दिला.

विधान भवन परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधिमंडळ सचिव जीतेंद्र भोळे यांनी  राज्यपालांचे स्वागत केले. त्याचवेळी विरोधकांनी राज्यपालांच्या निषेधाच्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत राज्यपालांच्या अभिभाषणावरून सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी हाणून पाडला. विधानसभेत कामकाज सुरू होताच राज्यपालाच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव गिरीश बापट यांनी मांडला. या प्रस्तावावर पावसाळी अधिवेशनात चर्चा घेण्याचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर करताच राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी त्यालाआक्षेप घेतला. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आत्ताच आभार प्रस्ताव चर्चेला घ्यावा, अशी मागणी भुजबळ यांनी केली. त्यावर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सन २००९ आणि २०१४ मध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्ताव पुढील अधिवेशनात घेण्यात आला होता. त्यावेळी भुजबळ यांच्या सूचनेनुसारच कामकाज सल्लागार समितीमध्ये तसा निर्णय झाला होता, असा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मारला.