नागपूर – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्दयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पुन्हा विधीमंडळाबाहेर निदर्शने केली. सभागृहातही हा मुद्दा लावून धरत विरोधकांनी व्हेलमध्ये जमून घोषणाबाजी केल्यामुळे विधानसभेचे कामकाज बुधवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला जात आहे. मंगळवारीही दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी विधीमंडळाबाहेर निदर्शने करीत घोषणाबाजी केली होती. सभागृहातही त्यांनी हा मुद्दा लावून धरल्यामुळे कामकाज सातत्याने तहकूब करावे लागले होते.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर खूप चर्चा झाली आहे. आता आम्हाला चर्चेत स्वारस्य नाही. सरकारने तात्काळ कर्जमाफी लागू केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना पॅकेज देण्याची घोषणाही केली पाहिजे. सभागृहात आम्ही याच मुद्द्यावर कायम राहणार आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले, गेल्या एक वर्षातील युती सरकारच्या कारभाराने राज्यातील शेतकऱ्याचा भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळेच आपल्या न्याय मागण्यांसाठी तो आता रस्त्यावर उतरला आहे. काल नागपूरमध्ये निघालेल्या मोर्चातून हे स्पष्ट झाले आहे.