मासेमारी क्षेत्राबाहेर मार्ग तयार करण्याची मच्छीमारांची मागणी

पश्चिम किनारपट्टीवर मालवाहतुकीला चालना मिळावी, यादृष्टीने सागरी उन्नत मार्ग अर्थात शिपिंग कॉरिडॉर (व्यापारी जलमार्ग) उभारणीचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. मात्र केंद्र सरकारच्या प्रयत्नांना स्थानिक मच्छीमार समुदायाने आक्षेप घेतल्याने गुजरातमधील कांडला ते कारवार दरम्यानचा हा प्रस्तावित मार्ग सध्या पूर्वस्थितीत ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत. असे असले तरी या मार्गाला मच्छीमारांचा विरोध कायम असून हा उन्नत मार्ग मासेमारी क्षेत्राबाहेर असावा, अशी मागणी राष्ट्रीय मच्छीमार संघटनेने केली आहे.

देशातील बंदरांचा विकास करून सागरमाला व इतर महत्त्वाकांक्षी योजनांद्वारे देशामध्ये मोठय़ा स्वरूपाची व्यापारी बंदरे उभारण्याचा प्रयत्न केंद्र शासन करत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र व गुजरात किनारपट्टीवरील वाढवण व नारगोळ येथील मोठी बंदरे प्रस्तावित आहेत. या बंदरांमध्ये मोठय़ा आकाराची व्यापारी जहाजे सहजगत्या यावीत याकरिता सागरीकिनाऱ्याच्या १२ नॉटिकल मैल अंतरावर सागरी उन्नत मार्ग उभारण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाने गेल्या वर्षी केला होता. या प्रस्तावाला सर्वत्र मच्छीमार समुदायाने कडाडून विरोध केल्याने सध्या हा मार्ग कारवार ते लक्षद्वीप, कन्याकुमारी या परिसरात कार्यरत आहे.

सागरीकिनाऱ्यापासून सुमारे १२ किलोमीटर दूर असलेली मुक्तिवेग मार्गिका (फ्री वे) ११ किलोमीटर रुंद असल्याने तसेच या मार्गिकेमधून मच्छीमारी बोटीला प्रवास करताना अनेक र्निबध घालण्यात आले असल्याने मच्छीमार समुदायाला व्यवसाय करण्यास अनेक अडचणी येत आहेत. सर्वसाधारणपणे समुद्रकिनाऱ्यापासून ५० ते ८० नॉटिकल मैलांपर्यंत मासेमारी केली जात असून या सागरी उन्नत मार्गाची रुंदी पाच किलोमीटपर्यंत कमी करावी तसेच हा मार्ग सागरी किनाऱ्यापासून १०० नॉटिकल मैलांच्या पलीकडे असावा, अशी मागणी नॅशनल वर्कर फोरमने केल्याचे संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. तसेच अशी मार्गिका उभारताना आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन व्हावे, अशी मागणीही मच्छीमारांच्या राष्ट्रीय संघटनेने केली आहे.

मासेमारी संघटनेची मागणी

व्यापारी जहाजांचा नौकानयन मार्ग, सागरी उन्नत मार्ग हा मासेमारी क्षेत्रापलीकडे असावा, अशी मागणी नॅशनल फिश वर्करचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केंद्र सरकारच्या संबंधित विभागांकडे केली आहे.

सहकार्याने वाहतूक करण्याचे निर्देश

केंद्रीय नौकानयन विभागातर्फे शिपिंग महासंचालकांमार्फत महाराष्ट्र व गुजरात किनाऱ्यालगत बसवलेल्या रडारच्या साहाय्याने सर्व जहाजे व नौकांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यात येत असून महाराष्ट्र व गुजरात किनाऱ्यावर पूर्वीप्रमाणेच मोठय़ा व्यापारी व मालवाहू जहाजांची वाहतूक सुरू आहे. या जहाजांनी मासेमारी क्षेत्रातून वावरताना कवीच्या क्षेत्रात आपला वेग व दिशा नियंत्रित ठेवून सामोपचाराने व सहकार्याने वाहतूक करण्याचे निर्देश शिपिंग विभागाकडून देण्यात आले आहेत. तसेच शिपिंग विभागाच्या निरीक्षकांकडून या व्यापारी जहाजांना वेळोवेळी सूचना दिल्या जात असल्याने या मोठय़ा जहाजांच्या वाहतुकीचा विशेष परिणाम सध्या तरी मासेमारीवर होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.