शाळाबाह्य काम असल्याने बहिष्कार टाकण्याचा निर्णय

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांमुळे राज्यातील शिक्षकांमध्ये आगोदरच नाराजीचे वातावरण असताना पालघर जिल्ह्य़ातील प्राथमिक शिक्षकांना धान्य वितरणाचे काम दिल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाडा तालुका शिक्षक सेनेने या कामाला विरोध केला आहे.

प्राथमिक शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांची नेहमीच चर्चा होत असते. निवडणूक कामे, जनगणना, स्वच्छता अभियान यांसारखी अनेक शाळाबाह्य कामे करताना तारेवरची कसरत करून शिक्षकांना आपले दैनंदिन अध्यापन करावे लागते. त्यातच पालघर जिल्ह्य़ातील प्राथमिक शिक्षकांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ‘अन्न दिन’ साजरा करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून शिक्षक सेनेने हे काम करण्यास विरोध दर्शविला आहे .

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ातील शिक्षकांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की प्रत्येक गावातील शिधावाटप दुकानांमध्ये दरमहा ७ तारखेला अन्नदिन साजरा करण्यात येणार आहे. सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी धान्य वाटप केले जाणार आहे. या दिवशी शिक्षकांनी आपली शाळा सोडून नियुक्ती दिलेल्या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत थांबून हे धान्यवाटप करावयाचे आहे. या कामासाठी अनेक महिला शिक्षकांनाही आपली शाळा सोडून दूरच्या गावांमध्ये नियुक्ती दिली गेली आहे. या कामांमुळे काही ठिकाणी शिक्षक व रेशन दुकानदार यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.

आधीच शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असताना या शाळाबाह्य़ कामांसाठी विद्यार्थी वाऱ्यावर सोडून जावे लागणार असल्याने शिक्षक चिंतेत आहेत. वास्तविक शासनाच्या आदेशाप्रमाणे शिक्षकांना जनगणना व निवडणुकीशिवाय अन्य कोणतीही अशैक्षणिक कामे देण्यात येऊ  नयेत, असे असताना हे काम लादल्याने शिक्षक सेनेने वाडय़ाच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

धान्यवाटप करणे हे शाळाबाह्य़ काम आहे. हे काम शिक्षकांना देणे चुकीचे असून या कामावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. – मनेश पाटील, कार्याध्यक्ष, पालघर जिल्हा शिक्षक सेना

 

वाडा तालुक्यात दरमहा सात तारखेला अन्नदिन साजरा करावा असा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी  पालघर यांनी काढला आहे. त्या संदर्भात वाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील काही मुख्याध्यापकांच्या नियुक्त्याही केल्या आहेत. हा आदेश शिक्षण विभागाचा नसून जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा आहे.

– जे. जे. खोत, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वाडा.