करोनाशी दोन हात करण्यासाठी  राष्ट्रवादी, काँग्रेसचे लोक तर माझ्यासोबत आहेतच शिवाय विरोधी पक्षही मला साथ देतो आहे. राजही मला फोन करतो आहे. सूचना देतो आहे. सर्वांनी एकजूट होऊन काम केलं पाहिजे आणि करोनाशी लढा दिला पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एक चांगली टीम तयार झाली आहे. जगभरात या विषाणूने थैमान घातलं आहे. कोणताही देश कोणत्याही देशाच्या मदतीला धावून येत नाही असं चित्र आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे समाधान व्यक्त केलं. ज्यांनी काळजी घेतली नाही त्यांची काय परिस्थिती आहे ते भीषण आहे. ती दृश्यं पाहिल्यानंतर ते चित्र भयंकर आहे. इतर राज्यातल्या कामगारांनी महाराष्ट्र सोडू नये. त्यांची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेणार. राहण्याची सोय आणि जेवणाची सोय आम्ही करतो आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली.

डॉक्टरांशी रोज संवाद

महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना मी मानाचा मुजरा करतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हात जोडले. तसंच ज्या डॉक्टरांशी शक्य आहे त्या सगळ्यांशी मी बोलतो आहे मला अनेकांनी सांगितलं तुम्ही डॉक्टरांशी बोला म्हणजे त्यांचं मनोधैर्य वाढेल. त्यांचं मनोधैर्य वाढतं आहे की नाही हे मला ठाऊक नाही मात्र त्यांच्याशी बोलल्यानंतर माझं मनोधैर्य वाढतं. या उर्जेला काय म्हणायचं? आरोग्य विषयक समस्येशी लढणाऱ्या या सगळ्या वीरांना माझा मानाचा मुजरा आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

अजूनही जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी अजूनही गर्दी केली जाते आहे, स्वयंंशिस्त पाळली जात नाहीये. ते लवकर आवरा नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागेल. पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालू नका. त्यांना कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

मी पोलिसांचेही आभार मानतो आहे. कारण पोलिसांचे काम हे देखील डॉक्टरांइतकेच महत्त्वाचे आहे. आपण सक्तीने घरी बसावं यासाठी ते बाहेर काम करत आहेत. त्यांचेही मी धन्यवाद देतो. घराबाहेरची लढाई तुमचंच सरकार लढतं आहे. तुम्ही फक्त घरात राहून आम्हाला साथ द्या असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पहिल्या पायरीवरच करोना थांबवण्यासाठी प्रयत्न केले तर आपण हे युद्ध जिंकल्याशिवाय राहणार नाही असाही आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.