पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड अखेर १५ दिवसांनी आज(मंगळवार) सर्वांसमोर आले. पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आल्यापासूनच संजय राठोड अज्ञातवासात गेले होते. एका ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांचं नाव चर्चेत आलं होतं. यानंतर भाजपाने जाहीरपणे संजय राठोड यांच्याविरोधात कारवाईची मागणी सुरु केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच संजय राठोड सर्वांसमोर आले व त्यांनी चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल, मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, असं सांगितलं. यावरून भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला व या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून मागणी केली आहे.

चौकशीतून जे समोर येईल, ते बघा…; संजय राठोडांनी पूजा चव्हाण प्रकरणावर सोडलं मौन

“संजय राठोड यांचे स्पष्टीकरण नसून थोतांड आहे. ज्या पक्षाचे ते मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे सरकार असल्यामुळे निष्पक्ष चौकशी होईल ही अपेक्षा ठेवावी तरी कशी? जर संजय राठोड निर्दोष असतील तर त्यांनी सीबीआय चौकशीला सामोरे जावे!” असं आमदार लाड म्हणाले आहेत.
तसेच, “बीडच्या पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणात संशयित असलेल्या संजय राठोड यांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी सीबीआय चौकशीचे आदेश त्वरित देऊन न्याय करावा. हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती!!” अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

“मंत्रीपदाचा गैरवापर मंत्रिपदावर असल्याने समाजातील लोकांना आकर्षित करणं, लोकांना फसवणं हा संजय राठोड यांनी स्वतःचा धंदा बनवून ठेवला आहे. जनतेला सर्व काही समजतं आहे, तुम्ही जर गुन्हा केला नव्हता तर १५ दिवस बिळात लपून का बसला होता? हा प्रश्न जनता व आम्ही विचारत आहोत. त्यामुळे बिळातून बाहेर आलेला हा जो नागोबा आहे, या नागोबाचं डोकं ठेचल्याशिवाय भाजपा गप्प बसणार नाही.” असा इशाराही आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे.

“माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार”; पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी अखेर मौन सोडलं

याचबरोबर “मुख्यमंत्र्यांना जर वाटत असेल की माझा मंत्री हा धुतलेल्या तांदळासारखा स्वच्छ आहे. तर त्यांनी ही चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी माझी व महाराष्ट्रातील जनतेची स्पष्ट मागणी आहे. सीबीआय चौकशीतून सत्य बाहेर येईल आणि संजय राठोड जे मंत्री म्हणून मिरवत आहेत, त्यांचा प्रथम राजीनामा घ्यावा नि:पक्षपाती चौकशी करावी.” असंही प्रसाद लाड म्हणाले आहेत.

तर, “बीडच्या पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्याप्रकरणी संशयित असलेले वनमंत्री संजय राठोड हे आज प्रसारमाध्यमांसमोर बोलत असताना, चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल, असं वारंवार सांगत होते. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे असेही ते सांगत होते. मात्र आज ज्या पद्धतीने त्यांनी शक्तीप्रदर्शन करून पोहरा देवीचं दर्शन घेतलं. त्या पद्धतीने निपक्षः पद्धतीने नक्कीच चौकशी होणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी, ही विनंती.” असं आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.