खडकीच्या आयुध निर्माण केंद्राचे यश

अनिकेत साठे, नाशिक

जवळच्या लढाईत शत्रूला जायबंदी करण्यासाठी हातबॉम्बचा वापर परिणामकारक ठरतो. हाताने फेकावे लागणारे हे बॉम्ब फार तर ३० ते ४० मीटपर्यंत जाऊ शकतात. म्हणजे त्याचा वापर करताना शत्रूला इतक्या जवळ येऊ देणे किंवा त्याच्या तितक्या जवळ जाणे हे दोनच पर्याय असतात. यात वापरकर्त्यांलाही धोका असतो. हा धोका कमी करतानाच शत्रूचा अचूक वेध घेईल, असा विशिष्ट बंदुकीतून डागला जाणारा बॉम्ब पुण्यातील आयुध निर्माणी केंद्राने विकसित केला आहे. तो ४०० मीटर अंतरावरील लक्ष्यभेद करू शकतो.

भारतीय लष्करातर्फे विविध प्रकारची शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा वापरला जातो. हातबॉम्ब हे त्यातील एक छोटेखानी पण महत्त्वाचे अस्त्र. एकाच वेळी अनेकांना गारद करणे, खंदकात, खोलीत लपून बसलेल्यांवर हल्ला चढविण्यासाठी ते उपयोगी ठरते. जमीन किंवा कोणत्याही पृष्ठभागावर आदळल्यानंतर काही वेळात तो फुटतो. त्याची काळजीपूर्वक हाताळणी करावी लागते. फेकल्यानंतर जवानाला दक्षता घ्यावी लागते, कारण त्यातून उडणारे धातूचे तुकडे पाच मीटरच्या परिघातील व्यक्तींना मारण्यास, तर १५ मीटरच्या परिघातील कोणालाही जखमी करण्यास पुरेसे ठरतात, असे लष्करी अधिकारी सांगतात.

आठ वर्षांच्या प्रयत्नानंतर खडकी आयुध निर्माण संस्थेने बंदुकीतून डागता येणारा बॉम्ब तयार केला आहे. हातबॉम्बसारखा विशिष्ट बंदुकीतून डागता येणारा हा बॉम्ब आहे. ‘मल्टिपल ग्रेनेड लाँचर’ (एमजीएल) आणि ‘अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर’ (यूबीजीएल) मधून तो डागता येतो. अतिशय कमी किंवा उच्च तापमानात तो वापरता येईल. आयुध निर्माणीने लक्ष्य भेदणारा, धूर पसरविणारा, प्रशिक्षण, आयुधाची बॅरल तपासणी अशा सहा प्रकारांमध्ये हे बॉम्ब तयार केले आहेत. सध्या लष्कराकडून त्यांची चाचणी प्रगतिपथावर आहे. चाचणीचे टप्पे पार पडल्यानंतर लष्कर मागणी नोंदवेल, असे खडकी केंद्रातील व्यवस्थापक फिलिप्स मॅथ्यू यांनी सांगितले. हे बॉम्ब डागण्यासाठी खास बंदूक बनविण्याचे काम समांतरपणे आयुध निर्माणीच्या अन्य केंद्रात प्रगतिपथावर आहे.

बंदुकीतून डागल्या जाणाऱ्या बॉम्बचे अनेक फायदे असतात. हातबॉम्बच्या तुलनेत त्याने दूरवर मारा करता येतो. शिवाय त्यात अचूकता अधिक असते, असे लष्करातील निवृत्त अधिकारी नितीन जोशी यांनी सांगितले.

वैशिष्टय़े..

’ मारक क्षमता ३७५ ते ४०० मीटर

’ ‘एमजीएल’, ‘यूबीजीएल’मधून डागता येईल.  आयुष्य दहा वर्षे

’ उणे २० ते अधिकतम ४५ अंशांपर्यंतच्या तापमानात कार्यरत

संशोधन काय?

’हाताने फेकावयाच्या बॉम्बला अंतराच्या मर्यादा पडतात. यामुळे लष्कराने काही वर्षांपूर्वी बंदुकीतून डागता येतील, अशा आधुनिक श्रेणीतील बॉम्बचा वापर सुरू केला; परंतु ते बॉम्ब परदेशातून आयात करावे लागतात. त्यांची लष्कराला जेवढी निकड आहे, तितकी उपलब्धता होत नाही.

’हे लक्षात घेऊन पुण्यातील खडकीस्थित आयुध निर्माणीने त्यावर काम सुरू केले. आठ वर्षांच्या प्रयत्नाअंती हा बॉम्ब बनविण्यात यश आल्याचे खडकी केंद्रातील व्यवस्थापक फिलिप्स

मॅथ्यू यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

’सीमावर्ती भागासह दहशतवादविरोधी कारवायांमध्ये त्याचा प्रभावीपणे वापर करता येणार आहे.