उस्मानाबाद

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्याबरोबरच मृत्युदर कमी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने सौम्य लक्षणे असलेल्या अथवा लक्षणे अजिबात नसलेल्या बाधित रुग्णांना घरीच उपचार घेण्याची मुभा देण्यात आली आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांनाही त्यांच्या इच्छेनुसार घरी क्वारंटाइन होता येणार आहे. जागतिक आरोग्य संघटना, केंद्र आणि राज्य शासनाने ठरवून मार्गदर्शक सूचनांनुसार हा निर्णय घेतला असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी जाहीर केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी पालकमंत्री गडाख यांनी आढावा बैठक घेतली. आपण स्वतः होम क्वारंटाइनमध्ये असल्याने जिल्हयातील परिस्थितीचा आढावा घेण्यास विलंब झाला असल्याचे नमूद करून त्यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. उस्मानाबाद जिल्हात मागील काही दिवसात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनावर कामाचा अतिरिक्त तणाव वाढत आहे. त्या अनुषंगाने काही महत्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले असल्याची माहिती गडाख यांनी दिली.

तपासण्यांची संख्या वाढविण्यासोबतच ‘हाय-रिस्क’ क्षेत्रात असलेल्या गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट आहे. अशा गंभीर रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. त्याकरिता सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या किंवा अजिबात लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना त्यांच्या इच्छेनुसार घरीच उपचार घेण्याची मुभा देण्यात आली आहे. परिणामी आरोग्य विभागातील यंत्रणेवर असलेला अतिरिक्त ताण कमी होईल असेही गडाख यांनी नमूद केले.

आणखी वाचा- उस्मानाबाद : अनलॉक 3.0च्या पूर्वसंध्येला करोनाग्रस्तांची संख्या हजारांपार

आरोग्यविभागात आवश्यकतेनुसार तात्काळ पद भरतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेद रुग्णालय या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन साधनसुविधांची आपण पाहणी केली आहे. आणखी व्हेंटिलेटर येणार आहेत. डॉक्टरांची संख्या तुलनेने कमी आहे ती वाढविण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया तात्काळ अमलात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील आठ दिवसात रिक्त जागा भरून काढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. साधनसुविधांवर भर देत असतानाच तपासण्यांची संख्या वाढविण्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार यापुढे कामास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यातून मृत्यचे वाढत असलेले प्रमाण रोखण्याचे उद्दिष्ट आपल्यासमोर असल्याचेही गडाख यांनी सांगितले.

रिक्त पदांची तात्काळ भरती करा – नगराध्यक्ष राजेनिंबाळकर

जिल्हा रुग्णालयात २०० खाटांची मंजुरी आहे. त्यानुसार कर्मचारी व अधिकाऱ्यांचा आकृतिबंधास मण्यात आहे. प्रत्यक्षात तब्बल १२३ पदे सध्या रिक्त आहेत. साथरोगाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शहरात एकही मोठे खासगी हॉस्पिटल नाही त्यामुळे कामाचा सर्व ताण जिल्हा शासकीय रुग्णालयावर आहे. परिस्थितीचे गांभीर्य आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या ध्यानात घेऊन आरोग्यविभागातील रिक्त पदांची तात्काळ भरती करण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी यावेळी केली.