मल्टिनॅशनल कंपन्यांच्या ‘मायाजालात’ अडकून आपली आयुष्यभराची कमाई घालवून बसणाऱ्या जनतेच्या हितरक्षणासाठी आता पोलिसांनीच पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे. अशा कंपन्यांच्या बैठका व पाटर्य़ा जिल्ह्य़ातील बडय़ा हॉटेलमध्ये होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे होणाऱ्या अशा बैठकांची सविस्तर माहिती संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकांनी तातडीने पोलिसांना द्यावी, अशी सूचना एका पत्रकाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. या सूचनेचे पालन केले गेले नाही तर हॉटेल व्यावसायिकाला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या लालसेने आपल्या आयुष्यभराची कमाई एखाद्या मल्टिनॅशनल फायनान्स कंपन्यांमध्ये गुंतवून नंतर पस्तावत बसणाऱ्या लोकांना या कंपन्यांच्या मायाजालात अडकण्यापूर्वी सावध करण्यासाठी आता पोलिसांनीच पुढाकार घ्यावा, असे वृत्त ‘लोकसत्ता’ (११, डिसेंबर २०१२) मध्ये प्रसिद्ध झाले आणि त्याची गंभीर दखल जि. पो. अधीक्षक यांच्या कार्यालयाने घेतली. याबाबत तातडीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात जिल्ह्य़ातील सर्व हॉटेल व्यावसायिकांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. यापुढे अशा कंपन्यांच्या होणाऱ्या बैठका तसेच पाटर्य़ाबाबतची सविस्तर माहिती हॉटेल व्यवस्थापकांनी पोलिसांना देण्याचे तसेच बैठकांसाठी पोलिसांनी दिलेली परवानगी पाहण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कंपन्यांनी कोणत्याही हॉटेलमध्ये बैठका घेण्यापूर्वी पोलिसांची लेखी परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. याबाबतचे पत्र जिल्ह्य़ातील बडय़ा हॉटेलवाल्यांना पोलिसांनी पाठविले असून, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी सक्त सूचना देण्यात आली आहे. या सूचनेचे पालन न करणाऱ्या संबंधित हॉटेल व्यावसायिकांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
मल्टिनॅशनल फायनान्स कंपन्यांबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने घेतलेल्या भूमिकेचे जिल्हावासीयांनी स्वागत केले आहे. फायनान्स कंपन्यांच्या मायाजालापासून लोकांनी सावध राहावे व पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.