तीन महिन्यांच्या कडक लॉकडाउननंतर आता सर्वत्र बऱ्यापैकी गोष्टी रुळावर आल्या आहेत. मात्र, त्यामुळे करोनाच्या रुग्णवाढीच्या घटनाही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर वारंवार सांगूनही लोक आवश्यक ती काळजी घेत नसतील, नियमांचे जर गांभीर्याने पालन झाले नाही तर पुन्हा पूर्वीसारख्या लॉकडाउनचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबई-पुण्यात, शहरात किंवा ग्रामीण भागात काही ठिकाणी लोक आता लॉकडाउनवैगरे सगळं संपलं असं वागत आहेत. पण हे काहीही संपलेलं नाही. भाजीवाले ठिकठिकाणी बसत आहेत तिथे गर्दी होत असून लोकांच्या तोंडावर मास्कही लावलेलं दिसतं नाही. त्यामुळे आपणहून कोविडला बळी पडू नका. काही प्राथमिक गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. म्हणजेच बाहेर फिरताना तोंडावर मास्क लावणे, एकमेकांपासून अंतर ठेवणं हे गरजेचं आहे. मॉर्निंग वॉकला, सकळच्या व्यायामाला आपण परवानगी दिली आहे. ती आरोग्य सुदृढ व्हावं म्हणून दिलेली आहे, आजाराला बळी पडण्यासाठी नाही.”

दरम्यान, काही गोष्टी आपण लॉकडाउनमधून उघडत चाललेलो आहोत, त्यामुळे काही केसेस वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर काही ठिकाणांवरुन आम्हाला विचारणा होत आहे की, या भागात पुन्हा लॉकडाउन करण्याची परवानगी देण्यात यावी. मात्र, लॉकडाउन करायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे, अशी थेट विचारणा मुख्यमंत्र्यांनी जनतेलाच केली आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्यांना दिला इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “जर गरज नसताना बाहेर पडलात आणि गर्दी केली. त्यामुळे केसेस वाढायला लागल्या तर पुन्हा येरे माझ्या मागल्या सारखे होईल. एका एका गोष्टींसाठी आपल्याला पुढे पाऊल टाकताना आता मागं यायचं नाहीए. त्यामुळेच जर मला असं वाटलं की गर्दी वाढतेय, करोनाच्या केसेस वाढतायत तर मी प्रशासनाला सांगितलं आहे की, अशा ठिकाणी जर आवश्यकता वाटली तर पहिल्यासारखं लॉकडाउन करण्याची गरज पडू शकते.”