शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने हातभार लावला पाहिजे. सरकारने तशी भूमिका घेतली नाहीतर, आम्ही याविरोधात ठोस भूमिका घेऊ असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. त्यांनी आज (गुरूवार) नाशिकमध्ये शेतांच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली.

यावेळी पवार यांनी, शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाची सखोल माहिती घेऊ व स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन सरकार दरबारी दाद मागू असे सांगितले. तसेच, सरकार संवेदनशीलपणे आमचे म्हणणे ऐकून मदत करेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी चर्चा केली. तसेच, सरकारने नुकसानभरपाईसाठी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, नुकसानभरपाईसाठी सरकारकडून जे निकष आता लावले जात आहेत, ते दोन ते तीन वर्षांपूर्वीचे आहेत. मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

नक्की वाचा : भाजपा-शिवसेना सत्तेच्या तिढ्यात, तर शरद पवार शेताच्या बांधावर

नाशिक जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यात तांदूळ, द्राक्ष, सोयाबीन, मका इत्यादी सर्वच पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी पिकांवर जो खर्च केला, तो वाया गेला आणि त्यांच्या हाती उत्पन्नही लागले नाही. असे पवार म्हणाले. यावेळी त्यांनी अडचणीत सापडलेल्या गोबापूर- कळवण तालुका येथील शेतकऱ्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या.