29 October 2020

News Flash

राज्यातील सहकारी जिनिंग-प्रेसिंग संस्था घसरणीला

राज्यातील १६१ पैकी केवळ ८९ संस्था कार्यरत असून त्यातील तब्बल ४४ संस्था तोटय़ात असल्याचे चित्र आहे.

(संग्रहित छायाचित्र)

१६१ पैकी आता केवळ  ८९ संस्था कार्यरत

मोहन अटाळकर, लोकसत्ता

अमरावती : राज्यातील कापसाच्या गाठी निर्यात करणाऱ्या खासगी जिनिंग-प्रेसिंग उद्योगाला चालना मिळाली असली, तरी  सहकारी जिनिंग-प्रेसिंग संस्था मात्र घसरणीला लागल्या आहेत. राज्यातील १६१ पैकी केवळ ८९ संस्था कार्यरत असून त्यातील तब्बल ४४ संस्था तोटय़ात असल्याचे चित्र आहे.

सहकार विभागाच्या अहवालानुसार, राज्यात पाच वर्षांपूर्वी १६१ सहकारी जिनिंग-प्रेसिंग संस्था (कापूस पिंजणी करणे व गासडय़ा बांधणे) होत्या. त्यापैकी केवळ ८९ संस्था सध्या कार्यरत आहेत. या संस्थांमधील राज्य सरकारचा भाग भांडवलाचा २० टक्के हिस्सा आहे. गेल्यावर्षी या संस्थांनी सुमारे ४५ मे.टन कापसावर प्रक्रिया केली.

विदर्भ आणि खानदेशात कापूस मोठय़ा प्रमाणावर पिकवला जातो. त्यामुळे या भागात सूत आणि कापड गिरण्या  उभ्या झाल्या. स्थानिक पातळीवर त्या काळात कापसाला मागणी होती, पण विविध कारणांमुळे कापड गिरण्यांना टाळे लागले आणि चित्र पालटले. या भागात सहकारी तत्त्वावर कापूस जिनिंग आणि प्रेसिंग संस्था उभ्या राहिल्या होत्या, त्या बराच काळ सुस्थितीत होत्या. पण दशकभराच्या काळात या संस्थांची आर्थिक बाजू कमकुवत होत गेली. योग्य व्यवस्थापनाअभावी संस्था तोटय़ात गेल्या.

सूत आणि कापड गिरण्या बंद पडल्यानंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. याच काळात कच्च्या कापसावर प्रक्रिया करून कापूस गाठींची निर्यात करण्याच्या उद्देशाने खासगी तत्त्वावरील जिनिंग-प्रेसिंग उद्योगाने भरारी घेतली. एकाधिकार संपुष्टात येण्याच्या काळात खासगी व्यापाराला चालना मिळाली. आता कापसाचा बाजार हा खुला झाल्याने जिनिंग-प्रेसिंग उद्योग पुन्हा बहरला.

खासगी पातळीवर हे चित्र असताना सहकारी जिनिंग-प्रेसिंग संस्था मात्र संधीचा फायदा घेऊ शकल्या नाहीत. सध्या राज्यातील केवळ ७७ सहकारी जिनिंग-प्रेसिंग संस्थांमध्ये उत्पादन चालू आहे. या संस्थांचे सुमारे  ७८ हजार सभासद आहेत. या संस्थांच्या भाग भांडवलात काहीशी वाढ झाल्याचे दिसत असले, तरी संस्था तोटय़ात जाण्यामागे काय कारणे आहेत, याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दूरगामी परिणाम

कृषी प्रक्रिया सहकारी संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्था विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. शेतकऱ्यांना उत्पादनाचा वाजवी मोबदला देणे आणि ग्रामीण उद्योगांच्या वाढीला चालना देऊन रोजगार निर्मिती करणे हे उद्देश समोर ठेवण्यात येत असले, तरी सहकारी जिनिंग-प्रेसिंग उद्योगांना घरघर लागल्याने त्याचे दूरगामी परिणाम येत्या काळात जाणवतील, अशी भीती सहकार क्षेत्रात वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 3:54 am

Web Title: out of 161 only 81 co operative ginning pressing institutes working in maharashtra zws 70
Next Stories
1 विदर्भातून विधान परिषदेसाठी कुणाला संधी?
2 ‘केके रेंज’ सराव क्षेत्रातील स्फोटात एक ठार
3 रिक्षाचालक तरुणाची हत्या
Just Now!
X