कौटुंबिक अडीअडचणींसाठी कर्ज घेणारे अनेक जण असतात, मात्र सामाजिक कार्यासाठी स्वत:चे घर गहाण ठेवून कर्ज काढणारे विरळाच. उस्मानाबाद जिल्हय़ातील कवठा (तालुका उमरगा) येथील विनायकराव पाटील या सामाजिक कार्यकर्त्यांने चारा छावणी सुरू करण्यासाठी स्वत:चे घर गहाण ठेवून १० लाखांचे कर्ज काढले, तसेच हातउसने १५ लाख रुपये उभे करून सुमारे ३ हजार जनावरांचा सांभाळ करण्याचा गोवर्धन पर्वत पेलण्याचे धाडस केले. कर्ज काढून जनावरांची छावणी सुरू करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयत्न ठरला आहे.
तीव्र दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने कवठा येथील भारत विकास प्रतिष्ठान संस्थेचे विनायकराव पाटील यांनी याही वर्षी पुढाकार घेतला. या पूर्वीही २०१२मध्ये २५ लाखांचे कर्ज काढून ४ महिने दीड हजार जनावरांचा सांभाळ त्यांनी केला होता. त्या वेळी विविध संस्थांनी त्यांना काही प्रमाणात आíथक मदतही केली. आताही तीव्र दुष्काळात त्यांनी या कामी पुढाकार घेतला. लातूर-उमरगा रस्त्यावर स्वतच्या २० एकर जागेवर गेल्या १५ जानेवारीपासून त्यांनी चारा छावणी सुरू केली. ३१ जानेवारीपर्यंत तब्बल ३ हजार १० जनावरे या छावणीत दाखल झाली आहेत. लातूर व उस्मानाबाद जिल्हय़ांच्या ४ तालुक्यांतील नारंगवाडी, बोरी, मातोळा, कवठा, नदीहत्तरगा, मुदगड एकोजी, किल्लारी, एकोंडी, येळवट, सरवडी व कोराळ या १० गावांमधील ही जनावरे आहेत.
एकूण ४० गावांमधील ६ हजार २२५ जनावरांना प्रवेशासाठी नोंदणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ३ हजार १० जनावरांवरच प्रवेश देण्यात आला. प्रत्येक जनावरासाठी शेडनेटचे शेड उभारले. शंभर जनावरांसाठी एक याप्रमाणे ३० गाळे करण्यात आले. गावनिहाय जनावरे बांधण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय, जनावरांच्या नोंदणीची पद्धत, जनावरांची निगा राखणे याकडेही बारकाईने लक्ष दिले जाते. चार कडबाकुट्टी यंत्रे असून प्रत्येक जनावरास खाद्य देण्यासाठी स्वतंत्र टोपल्याची व्यवस्था आहे. जनावरांना उसाची व कडब्याची कुट्टी दिली जाते. दोन हजार टन भावाने उसाची खरेदी केली जाते.
जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी ५ लाख लीटरचे तीन हौद बांधले. स्वत:चा व भावाचा १० एकर ऊस वाळवून छावणीत पाणी उपलब्ध केले. दहा जनावरांमागे २ हजार लीटरच्या सिंटेक्स टाक्या आहेत. पौष्टिक खाद्यासाठी सरकी पेंड, गोदरेजचे मिल्कमोअर व मक्याची चंदी दिली जाते. जनावरे स्वच्छ धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. जनावरांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. छावणी देखभालीसाठी तब्बल ७०जण कार्यरत आहेत. पुरुषांना महिना ५ हजार, तर महिलांना अडीच हजार रुपये मानधन दिले जाते. छावणीतील जनावरांच्या मालकांना जनावरांचे शेण स्वत:च्या शेतात घेऊन जाण्याची मुभा आहे. दुभत्या जनावरांचे दूध शेतकरी स्वत: घेऊन जातात. शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, भक्तिभाव, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, जगण्याची सुंदरता या विषयांवरील व्याख्यानेही घेतली जातात.
शेतकरी अडचणीत असल्यामुळे तो आपली जनावरे छावणीत घेऊन आला आहे. तो अडचणीत आहे व त्याची जनावरे आपण सांभाळत आहोत, म्हणून त्याचा सन्मान दुखावला जाईल अशी भाषा वापरू नका, असे काम करणाऱ्या सर्व मंडळींना विनायकराव पाटील यांनी सांगून ठेवले आहे. २०१२मध्ये चारा छावणी सुरू केल्यानंतर परिसरातील जागृती साखर कारखान्याने एक लाख रुपयांची मदत केली. ज्यांना शक्य आहे, त्यांनी ती मदत केली पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले. छावणीत दररोज सुमारे ७०० शेतकरी रात्री मुक्कामी असतात. सरकारकडे पाठपुरावा करून या शेतकऱ्यांच्या शेतावर जलसंधारणाची कामे घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. जनावरांना पुन्हा छावणीत दाखल करावे लागणार नाही, अशी स्थिती निर्माण करण्याचा या मागे प्रयत्न आहे. या बरोबरच शेतकऱ्यांना सेंद्रिय खत, गांडूळ खताची निर्मिती कशी करायची याचे प्रात्यक्षिकही देणार असल्याचे पाटील म्हणाले. या उपक्रमासाठी राज्य सरकारने सहकार्याची भावना ठेवल्यास पुढील चार महिन्यांचा आर्थिक भार पेलता येईल. यासाठी उपक्रमाची इत्थंभूत माहिती मुख्यमंत्र्यांकडे पाठवली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासन स्थितप्रज्ञ!
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांना चारा छावणीला भेट देण्याची विनंती करणारे सुमारे २५ दूरध्वनी आपण केले. प्रत्येक वेळी ते गोड बोलतात, कामाची स्तुती करतात. मात्र, भेट द्यावयास त्यांना अथवा शासकीय यंत्रणेतील मंडळींना वेळ मिळत नाही. उमरगा व लोहारा तालुका परिसरातील शेतकरी अडचणीत आहेत, मात्र येथील दुष्काळग्रस्त समस्यांचा आढावा प्रशासनाने घेतला आहे की नाही, हे समजणेही अवघड असल्याचे पाटील यांनी सांगितले.