परतीच्या पावसामुळे भातपिक पाण्यात; पीक वाचविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न
पालघर/वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस परिसरात मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह दोन तास पाऊस झाल्याने कापणी केलेले भात पाण्याखाली गेले. वेधशाळेने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजाने पालघर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. वाडा तालुक्यासह उर्वरित जिल्ह्य़ातील निम्म्याहून अधिक भात कापणीस तयार आहे.
यंदा खरीप हंगामातील हळवी आणि निमगरवे वाणांतील सर्व भातपिके कापणीस तयार झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करण्यास सुरुवातही केली आहे. वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या चार तालुक्यात सध्या रोज ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील भातपिकाची कापणी केली जात आहे. मात्र, हवामान खात्याने वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार परतीच्या पावसानेही वाडा, विक्रमगड तालुक्यात ठिकठिकाणी सुरुवात केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
गेल्या दोन दिवसांत शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात भातपिकाची कापणी केलेली आहे. कापणी केलेल्या भाताच्या कडपांना सुकविण्यासाठी दोन दिवस उन्हाची गरज असते, मात्र संभाव्य वादळी पावसाच्या भीतीने काही शेतकऱ्यांनी शेतातच
ताडपत्री टाकून झोडणी सुरूकेली आहे. मात्र, या भाताचेही परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. परतीचा पाऊस कोसळण्यापूर्वीच शेतात पिकून आलेले धान घरात जास्तीत जास्त कसे आणता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मानिवलीतील शेतकरी पुंडलिक राघो पाटील यांनी सांगितले.
‘कापणी करायची तरीही नुकसानच’
जिल्ह्य़ाच्या विविध भागांत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांनी कापणीची कामे थांबवली आहेत. मात्र, काही वाणांची भाते कापणीस तयार झाल्यानंतर योग्य वेळी कापणी न झाल्यास या भाताचे लोंग शेतातच गळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे भातकापणी करायची की थांबवायची अशा दुहेरी संकटात येथील शेतकरी सापडला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 12:16 am