24 August 2019

News Flash

पुण्यात जन्मलेली ‘पाकिस्तानी’ महिला पुन्हा झाली भारतीय

लग्नानंतर रजनी प्रेमनाथ पतीसोबत पाकिस्तानात स्थायिक झाल्या होत्या

लग्नानंतर पाकिस्तानात स्थायिक झालेल्या पुण्याच्या रजनी प्रेमनाथ यांना भारतीय नागरित्व मिळालं आहे

भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या ४५ पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व प्राप्त झाले आहे. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात वास्तव्य करणाऱ्या ४५ पाकिस्तानी अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र दिले. त्यापैकी एक आहेत तेलुगू धोबी समाजातील पण मराठमोळ्या रजनी प्रेमनाथ.

रजनी प्रेमनाथ या तेलुगू धोबी समाजातील आहेत. 1957 रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला. 1983 रोजी त्यांच्याच समाजातील पाकिस्तानी नागरिक असणाऱ्या प्रेमनाथ बाबू यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर पतीसोबत त्या कराचीत स्थायिक झाल्या होत्या.

‘माझे पती दुबईत काम करतात तर सासू-सासरे पाकिस्तानात राहतात. लग्नानंतर मी पाकिस्तानात स्थायिक झाले आणि तिथलं नागरिकत्व स्विकारलं. मी 20 वर्ष तिथे राहत होते. कराचीमधील एका मंदिरात आम्ही राहत होतो. पाकिस्तानाच मी सहा मुलांना जन्म दिला. पण जसजशी परिस्थिती बिघडू लागली आणि असुरक्षित वाटू लागलं आम्ही मुलांच्या सुरक्षेची चिंता लागल्याने पाकिस्तान सोडलं’, अशी माहिती रजनी प्रेमनाथ यांनी दिली आहे.

2004 मध्ये रजनी प्रेमनाथ मुलांसोबत पुण्यात येऊन स्थायिक झाल्या. ‘माझे पतीदेखील 2006 मध्ये पुण्यात आले. तेव्हापासून आम्ही येथे राहत असून भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही 2016 साठी त्यासाठी अर्जही केला. आज मला आणि माझ्या पतीला नागरिकत्व मिळालं आहे. माझ्या मुलांसाठीही अर्ज केला असून त्यांना लवकरच नागरिकत्व मिळेल अशी आशा’, अशी भावना रजनी प्रेमनाथ यांनी व्यक्त केली आहे.

रजनी प्रेमनाथ पुण्यातील खडकी येथे राहतात. ‘माझे पालक, बहिण आणि तिघे भाऊ सगळे भारतात राहतात. पण मला लग्नानंतर पाकिस्तानात स्थायिक व्हावं लागलं होतं. आज माझी आई जिवंत असती तर मला पुन्हा भारतीय होताना पाहून आनंदी झाली असती’, असं रजनी प्रेमनाथ यांनी सांगितलं आहे.

रजनी यांचा हा प्रवास खडतर होता. यावेळी त्यांच्या हाती अनेकदा निराशाच आली. ‘ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये माझे पती कंत्राटदार म्हणून काम करतात. पाकिस्तानातून भारतात स्थायिक झाल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दोन वेळचं अन्न मिळवण्यासाठी आम्हाला खूप कष्ट करावे लागले. इतकी वर्ष आमच्या पाकिस्तानी नागरिकत्वावर बोलणं टाळलं. पण आता गोष्टी सहज होतील’, असं रजनी प्रेमनाथ यांनी सांगितलं आहे.

First Published on March 8, 2019 10:09 am

Web Title: pakistani woman born in pune becomes indian citizen again