नव्याने उभ्या राहाणाऱ्या गृहसंकुलांतील सदनिकाधारकांना अनुदानाचा लाभ

पालघर : प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुदान मिळण्यास पालघर तालुक्यातील सर्व गावांचा समावेश गृहनिर्माण विभागाने केला असून या भागांमध्ये यापुढे उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलांमधील सदनिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाने १ नोव्हेंबर २०१९ पासून संपूर्ण पालघर तालुक्याला या योजनेत समाविष्ट करण्यासंदर्भात निर्णय घेतला असून यापूर्वी या योजनेतील लाभांपासून वगळण्यात आलेल्या बोईसर, उमरोळी, सफाळे इत्यादी भागांमध्ये सदनिका विकत घेतलेल्या आणि अनुदानापासून वंचित झालेल्या सुमारे साडेचार हजार नागरिकांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे.

पंतप्रधान आवास योजनेमध्ये यापूर्वी फक्त पालघर शहराचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यातील लगतच्या वेगवेगळ्या गावांमध्ये सदनिका घेतलेल्या नागरिकांना यापूर्वी अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. तर सुमारे साडेचार हजार नागरिकांना शासनातर्फे वित्तीय संस्थेने दिलेल्या अनुदान परत घेतल्याने अशा मंडळींसमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. या प्रकरणी या नागरिकांनी आपली फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या.

याविषयी राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने १४ नोव्हेंबर रोजी पत्रक काढून केंद्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाला याबाबत अवगत केले आहे. राज्य सरकारने मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथोरिटी अर्थात एमएमआर क्षेत्राचा विस्तार पालघर तालुक्यापर्यंत करण्याचा निर्णय ९ सप्टेंबर रोजी घेतला असून त्यामुळे बोईसरसह पालघर तालुक्यातील सर्व गृहसंकुले शहरी भागासाठी लागूू असल्याचे पत्र गृहनिर्माण विभागाचे सचिवांनी केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकास विभागाच्या संचालकांना दिले आहे. यामुळे या योजनेत नव्याने अनुदान प्राप्त करणाऱ्या अर्जदारांना या योजनेतील सहजगत   लाभ मिळणे शक्य होणार आहे.

दरम्यानच्या काळात राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने पालघर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यास पात्र असल्याबाबत परिपत्रक काढल्याने यापूर्वी या योजनेमध्ये सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना त्याचा लाभ मिळावा याकरिता संबंधित नागरिक लोकप्रतिनिधींची मदत घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहेत.

साडेचार हजार नागरिकांना दिलासा?

गेल्या अडीच वर्षांच्या काळात पालघर तालुक्यातील साडेचार हजार नागरिकांची सदनिका खरेदी करताना या योजनेचा लाभ मिळेल या आश्वासनावर विकासकांनी फसवणूक केली. यापैकी अधिकांश नागरिकांना अनुदान मिळाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांपूर्वी बोईसर, उमरोळी, सफाळे आदी भागांत पंतप्रधान आवास योजनेच्या शहरी विकास प्रकल्प येत नसल्याचे कारण देऊन अनुदान परत घेण्यात आले होते. यामुळे अशा सर्व व नागरिकांचा कर्ज परतफेडीचा मासिक हप्ता वाढल्याने अशा सदनिका खरेदी केलेल्या लोकांमध्ये नाराजी ओढवली होती. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास केला जात आहे. आता संपूर्ण पालघर तालुक्यात पंतप्रधान आवास योजना लागू होणार असल्याने या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.