News Flash

ग्रामीण भागांत पंचनाम्याचे काम सुरू

पालघर जिल्ह्य़ात चक्रीवादळामुळे समुद्र किनारपट्टी लगतच्या भागासह ग्रामीण भागांत शेतकरी व बागायतदारांचे तसेच मच्छीमारांचेही मोठे नुकसान झाले आहे.

पालघर : पालघर जिल्ह्य़ात चक्रीवादळामुळे समुद्र किनारपट्टी लगतच्या भागासह ग्रामीण भागांत शेतकरी व बागायतदारांचे तसेच मच्छीमारांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरचीही पडझड झाली आहे. या पाश्र्वभूमीवर कृषी, महसूल विभागासह मत्स्यव्यवसाय विभागामार्फत झालेल्या नुकसानीचे पंचनामे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अडीच हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र  बाधित झाले आहे. याचबरोबरीने समुद्र किनारपट्टी लगत असलेल्या मच्छीमार गावांमधील मच्छीमारांच्या बोटींसह मासेमारीची जाळी व इतर साहित्याचेही  नुकसान झाले आहे.  जिल्ह्य़ातील आठ तालुक्यांत विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम  सुरू केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले आहे.

मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे मत्स्यव्यवसाय विभागाने नेमलेल्या विविध अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहेत. बोटी, मासेमारी जाळी व इतर साहित्य यांच्या नुकसानीचे पंचनामे हे अधिकारी नोंदवून घेत आहेत. हे सर्व पंचनामे नोंदवल्यानंतर वस्तू निहाय त्याची वर्गवारी करून तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत व तज्ज्ञ मार्फत नुकसानभरपाईची रक्कम ठरवून त्यानुसार हे अहवाल शासनाकडे सादर केले जाणार असल्याचे मत्स्यव्यवसाय सह आयुक्त आनंद पालव यांनी म्हटले आहे.

कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने कृषी विभागामार्फत बाधित कृषी क्षेत्राचे पंचनामे व अहवाल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. फळबागा सह दुबार भाताचे मोठे नुकसान झाले असल्याने येत्या काही दिवसांत हे पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारचे पंचनामे व अहवाल पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाईचे अहवाल राज्य शासनाकडे सादर केले जाणार असून तेथूनच नुकसानभरपाईची एकूण रक्कम जिल्ह्य़ाला प्राप्त होणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 2:57 am

Web Title: panchnama work started in rural areas ssh 93
Next Stories
1 वसई-विरारमधील मिठागरे पाण्यात
2 इमारत जमीनदोस्त करताना अधिकाऱ्यांना मारहाण
3 कारागिरांची कमतरता
Just Now!
X