‘‘नाटकाने प्रेक्षकांची हलकीफुलकी करमणूक केली पाहिजे, पण नाटकाचे अंतिम उद्दिष्ट किंवा ध्येय मात्र ते असता कामा नये. मराठी नाटकांची ती परंपरा नाही. संस्कृती आणि संस्कारांचे सोनेदेखील नाटकाने लुटले पाहिजे,’’ असे मत केंद्रीय गृहमंत्री आणि  ९४ व्या अ.भा. मराठी नाटय़ संमेलनाचे उद्घाटक सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केले. पडद्यामागचा कामगार नाटय़संमेलनाध्यक्ष व्हावा, हे आपले स्वप्न दिवास्वप्न ठरू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दीप प्रज्वलन करून शिंदे यांच्या हस्ते नाटय़संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी नाटकांकडून काय अपेक्षीत आहे, यावर मतप्रदर्शन केले. नाटकात संस्कृती आणि संस्कार दिसले पाहिजे. अर्थात हा चमत्कार एका रात्रीत होणार नाही, तर त्यासाठी नवीन प्रतिभेचा, नवे नाटककार, कलाकार, तंत्रज्ञ व निर्मात्यांचा शोध घ्यायला हवा. याकरिता गावपातळीपासून तरुणांना नाटकाकडे येण्यासाठी उद्युक्त करायला हवे आणि हे काम नाटय़कर्मीनी त्यांच्याशी संवाद साधून करायला पाहिजे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
व्यावसायिक आणि प्रायोगिक तसेच समांतर धारेतील रंगप्रवाहांचे हृद्य संगम असलेले बहुधा हे पहिलेवहिले नाटय़ संमेलन महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पंढरीत आजपासून अत्यंत उत्साहात सुरू झाले. मावळते नाटय़ संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांनी जरी ‘नाटय़ संमेलनाध्यक्षपदाचा काहीही उपयोग नसतो,’ असे मत व्यक्त करून सकाळी निघालेल्या भव्य, जल्लोषपूर्ण नाटय़‘दिंडी’चे ‘वराती’त कधी रूपांतर झाले हे कळले नाही, असा उपरोधपूर्ण टोला हाणला असला तरी पंढरपूरमध्ये प्रथमच होत असलेल्या अशा प्रकारच्या भव्य संमेलनातील रसिकांचा उत्साह जराही कमी झालेला दिसत नव्हता.
पडद्यामागचा कामगार संमेलनाध्यक्ष व्हावा
आजवर आपण नट, नाटककार, निर्माते यांची नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलीत. पण यापुढे कधी तरी तुमचे नाटक रंगवण्यासाठी कायम अंधारात धडपडणाऱ्या एखाद्या रंगमंच कामगारास नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या सिंहासनावर विराजमान होण्याचा मान आपण जरूर द्यावा. यामुळे कायम अंधारात धडपडणाऱ्या रंगमंच कामगारांच्या समस्यांना, प्रश्नांना प्रकाश मिळाल्याशिवाय राहणार नाही,’’ असे शिंदे यांनी या वेळी सांगितले.
सरकारकडून पावणेचार कोटींचा निधी
सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी पावणेचार कोटी रुपयांचा धनादेश शासकीय अनुदान म्हणून नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. तीन वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाच कोटी रुपयांचे अनुदान नाटय़ परिषदेस देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी पावणेचार कोटी रुपयांचा धनादेश देऊन त्या आश्वासनाची आज पूर्तता करण्यात आली.त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत जगातील पहिली फिल्म युनिव्हर्सिटी आणि थिएटर युनिव्हर्सिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणा देवतळे यांनी केली.  
*यंदाच्या संमेलनास नाटय़कर्मी व कलावंतांची उपस्थिती लक्षवेधी होती. मुक्ता बर्वे, आदिती सारंगधर, रीमा, रमेश भाटकर, विजय केंकरे, मंगेश कदम, अरुण होर्णेकर, वीणा जामकर, लालन सारंग, फैयाज, श्रीकांत मोघे, राम जाधव,  सुरेश खरे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रदीप मुळ्ये, अशोक हांडे, प्रसाद कांबळी, गंगाराम गवाणकर, अनंत पणशीकर आदींचा त्यात समावेश होता.
*खासदार रामदास आठवले यांनी आपल्या शीघ्र कवितांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांना मारलेल्या कोपरखळ्यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.
*सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वागताध्यक्ष आ. भारत भालके यांना संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत मंत्र्यांची नावे छोटय़ा टाइपात छापल्याबद्दल कानपिचक्या दिल्या.