मराठा आरक्षणावरून आंदोलकांनी दिलेल्या इशाऱ्याचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला न जाण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत शासकीय पूजेचा मान वारकरीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पूजेला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहतील, असे सांगण्यात येते.

‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आषाढीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. यंदा मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पूजा करू न देण्याचा इशारा दिला होता. गुप्तचर खात्याचा अहवाल आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला.

आषाढी एकादशी निमित्त सुमारे १५ लाख भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या मराठा समाजात तीव्र भावना आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी पुजा करु न देण्याचा पवित्रा घेतल्याने त्यांच्या भावना लक्षात घेता, कुठलाही अनुचित प्रकार उद्या येथे घडू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुजेला न येण्याचा निर्णय घेतला असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले होते. नंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: माध्यमांशी संवाद साधत आपला निर्णय जाहीर केला होता.

ते म्हणाले, आषाढी एकादशीची शासकीय पुजा मुख्यमंत्र्यांनी करावी असी परंपरा आहे. मात्र, यावर्षी काही संघटनांनी मी पुजा करायला जाऊ नये, अशी भुमिका घेतली आहे. मात्र, त्यांची ही भुमिका चुकीची आहे. वारकऱ्यांना वेठीस धरुन अशा मागण्या करणे योग्य नाही. विठ्ठलाची पुजा करण्यापासून मला कोणाही रोखू शकत नाही. मात्र, १० लाख लोकांच्या जीवाला धोका असल्याने मी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढीच्या दिवशी वारकऱ्यांमध्ये काही लोक घुसून चेंगराचेंगरी घडवण्याचा डाव असल्याचे पोलिसांकडून माहिती मिळते आहे.