अमेरिका, जर्मनी, ब्राझीलच्या नागरिकांची भेट

पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लाखो भाविकांना असते. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेकडो वर्षांची परंपरा जोपासत पंढरीची वारी भाविक करतात. वारकरी संप्रदायाच्या शिकवणीचा अभ्यास देशासह विदेशातील अभ्यासक करीत आहेत. ही संस्कृती जाणून घेण्यासाठी अमेरिका, ब्राझील, जर्मनी आदी देशांतील ४० हून अधिक नागरिक पंढरीत दाखल झाले आहेत.

मुळचे भारतीय असणारे स्वामी विश्वातनंद परमहंस हे जर्मनीमध्ये स्थायिक आहेत. ते जर्मनीबरोबरच अमेरिका, ब्राझिल आदी देशात हिंदू धर्म तत्तवज्ञान प्रसाराचे कार्य करतात. त्यांचे शिष्यत्व पत्करलेले हे विदेशी नागरिक सध्या भारतातील विविध तीर्थक्षेत्रांना भेट देत आहेत. याअंतर्गतच हे ४० हून अधिक विदेशी नागरिक नुकतेच पंढरीच्या भेटीवर आले आहेत. अंगात भगवी वस्र, कपाळावर भव्य गंध तर अनेक संस्कृत श्लोक मुखोद्गत असणारे हे परदेशी वारकरी दोन दिवसांपासून पंढरी मुक्कामी आहेत. त्यांचा हा पेहराव, त्यांना माहिती असलेले आपले धार्मिक वाङ्मय पाहून स्थानिकांसह इथे आलेले हजारो भाविकही अचंबित होत आहेत. त्यांना पाहण्यासाठी मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून हे सर्व परदेशी वारकरी पंढरपूर मुक्कामी आहेत. येथील सर्व धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी होत आहेत. भजन सेवा देत आहेत. ते केवळ यावर न थांबता भागवत संप्रदायातील  अनेक संतांची माहिती घेत आहेत. त्यांचे विचार, अभंगाचा अर्थ जाणून घेत आहेत. या विदेशी नागरिकांच्या सोबत एक दुभाषी असून त्याच्या मदतीने हे विदेशी नागरिक विठुरायाच्या या नगरीत दंग झाले आहेत. पंढरपूरनंतर हे सर्व विदेशी नागरिक सज्जनगडालाही भेट देणार आहेत.

आमच्या काल्याच्या वाडय़ात ही  विदेशी भक्त मंडळी आली. आमच्याकडील पादुका आणि परंपरा जाणून घेतल्या. आम्ही देवापुढे म्हणत असलेले अभंग, श्लोक याची नुसती माहिती घेतली नाही तर त्याविषयीचे टिपण त्यांनी नोंदवून घेतले. सर्वांनी मिळून विष्णूसहस्रनामाचे पठणदेखील केले. त्यांची ही ओढ आणि चिकाटी थक्क करणारी होती. – ह.भ.प. मदन महाराज हरिदास