माघी एकादशी निमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात नित्यपूजा पार पडली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सपत्नीक तर रुक्मिणीमातेची पूजा समितीचे लेखा अधिकारी सुरेश कदम यांच्या हस्ते पार पडली. यानिमित्त मंदिर समितीने श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या गर्भगृह, प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक आरास केली आहे. पुण्यातील मोरया ग्रुपतर्फे ही फुलांची आरास करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
माघी एकादशीनिमित्त विठुरायाचा जयघोष आणि टाळ-मृदूंगाच्या वादनाने अवघी पांढरी दुमदुमून निघाली आहे. वारकरी संप्रदायासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या माघ वारीसाठी कोकण, मराठवाडा, बेळगाव आदी ठिकाणाहून भाविक दरवर्षी येत असतात. यंदा या वारीसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. आज पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाची नित्यपूजा पार पडली. यानिमित्त मंदिराला झेंडू, शेवंती, स्पिंगर आणि जरबेरा या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या कामी जवळपास २०० किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे.
भाविकांनी केले पवित्र स्नान
एकादशीनिमित्त भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नान, नागर प्रदक्षिणा करून विठुरायाचे दर्शन घेतले. यासाठी चंद्रभागा नदीच्या पैलतरावरील ६५ एकर जागेत भाविक मोठ्या संख्येने मुक्कमी आहेत. तसेच यंदा चंद्रभागा नदीला पुरेसे पाणी असल्याने भाविकांना पवित्र स्नानही करता आले.
चोख सुरक्षा व्यवस्था
दरम्यान, शहरात कोणताही अनुचित प्रक्रार होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच तीर्थक्षेत्र पोलिसिंगद्वारे भाविकांना मदत केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 5, 2020 1:07 pm