हिंगोली लोकसभा मतदारसंघात १६ वर्षांपासून काँग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजा, तर २४ वर्षांपासून भाजपचे कमळ चिन्ह मतदारांसमोर आले नाही. मात्र, आता दोन काँग्रेसच्या आघाडीत काँग्रेसची उमेदवारी आमदार राजीव सातव यांना मिळाल्याने मतदारांसमोर पंजा निवडणूक चिन्ह आले आहे.
िहगोली मतदारसंघ पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. उत्तमराव राठोड येथून सलग ३ वेळा निवडून आले. नंतर मात्र कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजय मिळाला. १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील यांनी सेनेच्या अॅड. शिवाजी माने यांचा पराभव केला. या निवडणुकीत सूर्यकांता पाटील यांचे निवडणूक चिन्ह पंजा होते. त्यानंतर मात्र मतदारांसमोर पंजा निवडणूक येण्यास १६ वर्षे लागली. १९९८ मध्ये पाटील विजयी झाल्या. परंतु त्यानंतर वर्षभरातच लोकसभा बरखास्त होऊन नव्याने निवडणुका लागल्या. १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला.
दरम्यानच्या काळात झालेल्या निवडणुकीत िहगोलीची जागा भारिप-बहुजन महासंघाला सुटली व काँग्रेसचे पंजा चिन्ह मतदारांसमोर आले नाही. राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील व भारिप-बहुजन महासंघ उमेदवाराचा सेनेचे अॅड. माने यांनी पराभव केला. २००४ मध्ये दोन काँग्रेसची आघाडी झाली व राष्ट्रवादीकडून सूर्यकांता पाटील यांनी घडय़ाळ चिन्हावर निवडणूक लढविली. त्यांनी सेनेच्या माने यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. २००९ च्या निवडणुकीतही हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आला. या निवडणुकीत सेनेच्या सुभाष वानखेडे यांनी सूर्यकांता पाटील यांचा पराभव केला.
१९८९ मध्ये भाजप उमेदवार विलास गुंडेवार यांना पक्षाचे कमळ चिन्ह मिळाले होते. १९९१ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीत ही जागा शिवसेनेकडे गेली. गुंडेवार यांनी पक्षांतर करून सेनेत प्रवेश केला व धनुष्यबाण चिन्हावर ते निवडून आले. परंतु तेव्हापासून येथे भाजपचे कमळ चिन्ह मागे पडले. यंदा मात्र दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत िहगोलीची जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला सुटली व पक्षाने आमदार सातव यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे तब्बल १६ वर्षांनी या मतदारसंघात काँग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजा मतदारांसमोर आले.