माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. परळीत मराठा मोर्चेकरांनी ठिय्या आंदोलन केलं असून त्यांच्याशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी मी सरकारची नाही तर मराठी बांधवांची दूत बनणार असल्याचं सांगितलं.

‘मी तुमचा आक्रोश ऐकण्यासाठी आणि वेदना जाणून घेण्यासाठी आली आहे. मी तुम्हाला वाकण्यास सांगणार नाही. मी शिवरायांची शपथ घेऊन सांगते, जर मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलावर असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते’, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मी तुमच्या मनातील वेदना जाणून घेण्यासाठी आली आहे असं सांगत हवं तर जीव घ्या, पण जीव देऊ नका असं आवाहन केलं. काकासाहेब शिंदे यांच्याबद्दल बोलताना आपण एक मराठा लाख मराठा म्हणतो, मग एक तरुण मेला म्हणजे लाख तरुण मेले नाहीत का ? असा सवालही त्यांनी विचारला.

मराठा आरक्षणासाठी आपण पंतप्रधानांपर्यंत जाऊ असं आश्वासन यावेळी पंकजा मुंडे यांनी दिलं. आंदोलनात चूक नसणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असतील तर गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.