News Flash

अँटिलिया प्रकरण : अहवालात बदल करण्यासाठी परमबिर सिंग यांनी ५ लाख रुपये दिले; सायबर तज्ज्ञाचा दावा

अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूच्या प्रकरणांमध्ये एनआयएच्या आरोपपत्रात या सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवण्यात आला.

parambir singh
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (संग्रहित छायाचित्र)

एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी अहवालात बदल करण्यास सांगितले होते, असा दावा अँटिलिया बॉम्ब प्रकरणी मुंबई पोलिसांसोबत काम केलेल्या एका सायबर तज्ज्ञाने केला आहे. या प्रकरणात जैश-उल-हिंदचे पोस्टर जोडणे आवश्यक असल्याचं म्हणत सिंग यांनी या कामासाठी ५ लाख रुपये देण्याचं वचन दिलं होतं असंही या तज्ज्ञानं म्हटलंय. अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूच्या प्रकरणांमध्ये एनआयएच्या आरोपपत्रात या सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवण्यात आला. या तज्ज्ञाने २५ फेब्रुवारी रोजी या घटनेची चौकशी करून मुंबई पोलिसांना अहवाल सादर केला होता.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या काड्या आढळल्या होत्या. या कृत्याची जबाबदारी जैश-उल-हिंद नावाच्या एका संघटनेने टेलिग्राम चॅनेलवर स्वीकारली होती. मार्च २०२१ मध्ये या प्रकरणाचा तपास एनआयएला सोपवण्यात आला होता. एनआयएच्या तपासादरम्यान, एका सायबर तज्ज्ञाने सांगितले की, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात ९ मार्च रोजी त्याने मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांची भेट घेतली होती. यावेळी आपण या वर्षी जानेवारीमध्ये इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोट प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला मदत केली होती, असे सिंग यांना सांगितले होते. तसेच जैश-उल-हिंदने तिहाड जेलमधील एका फोन नंबरबर टेलिग्रामवर या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती, असं सांगितलं. यावेळी परम बीर सिंह यांनी त्याला अँटिलिया प्रकरणात असाच अहवाल देण्यास सांगितले होते, असा दावा या सायबर तज्ज्ञाने केला आहे.

“मी लेखी स्वरुपात असा अहवाल देऊ शकतो का, असं सिंग यांनी मला विचारलं. मी म्हटलं की, हे काम गोपनीय आहे आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून केले जात आहे. त्यामुळे कोणताही अहवाल देणे योग्य नाही. पण सिंग म्हणाले की, ही एक अतिशय महत्वाची बाब असून मी तो अहवाल द्यावा. तसेच ते एनआयएच्या आयजीशी या संदर्भात बोलणार होते,” असेही या तज्ज्ञाने सांगितले.

“सिंग यांच्या आग्रहानुसार, मी त्यांच्या कार्यालयात बसून माझ्या लॅपटॉपवर एका पॅराग्राफचा अहवाल तयार केला आणि तो सिंग यांनी दाखवला. अहवाल पाहिल्यानंतर परमबिर सिंग सरांनी मला त्या अहवालात टेलिग्राम चॅनेलवर दिसणारे पोस्टर आणि जैश उल हिंदने अँटिलिया प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत असल्याचं टाकण्यास सांगितले. त्यानुसार, मी माझ्या अहवालात बदल केला आणि ‘जैश उल हिंद’ या टेलिग्राम वाहिनीवर दिसणारे पोस्टर घातले आणि हा अहवाल सीपी मुंबईच्या अधिकृत ईमेल आयडीवर मेल केला. हा अहवाल ते लवकरच एनआयएच्या आयजीला दाखवणार असल्याचं ते म्हणाले होते, असं तज्ज्ञाने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 12:36 pm

Web Title: param bir singh got cyber expert to change report paid rs 5 lakh nia chargesheet in antilia case hrc 97
Next Stories
1 “तुम्ही सत्तेसाठी मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलंय”, संजय राऊतांच्या टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर
2 …पण आयत्या बिळातला नागोबा असता कामा नये; चिपी विमानतळावरून विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका
3 “माझ्या जीवाला धोका,” भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेवर अत्याचार; रुपाली चाकणकरांनी ट्वीट केला व्हिडीओ
Just Now!
X