राज्यातील धनगर व तत्सम जातींचा, तसेच कोणत्याही बिगर आदिवासी जमातीचा आदिवासी सूचित समावेश करून त्यांना आरक्षण देऊ नये, यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी पारधी महासंघातर्फे शनिवारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महासंघाचे कार्याध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाजवळ हे आंदोलन झाले. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील ४५ आदिवासी जमातींपकी आदिवासी पारधी ही एक जमात आहे. ती अत्यंत अप्रगत व मागास अवस्थेत आहे. राज्यात दरवर्षी पारधी समाजाच्या विकासावर कोटय़वधी रुपये खर्ची घातले जातात. परंतु तरीही विकास साध्य झाला नाही. या जमातीच्या अनेक समस्या आहेत. समाजावरील अत्याचाराविरोधात संघटना मागील १५-२० वर्षांपासून लढा देत आहे. धरणे, उपोषणे, मोच्रे आदी मार्गानी आंदोलने करूनही राज्यकर्त्यांनी आंदोलनाची व समाजाची दखल घेतली नाही.
याउलट शिक्षणसम्राट, प्रगतिशील शेतकरी, धनाढय़ हे खुल्या प्रवर्गावर मात करणाऱ्या धनगर व तत्सम जातींचा आदिवासींमध्ये समावेश करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे अशा निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन असल्याचे निवेदनात म्हटले आहे. धनगर व इतर जातींचा समावेश अनुसूचित जमातीत करू नये. आदिवासी पारधी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, त्यासाठी १०० कोटींची तरतूद करावी, ठाण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे स्थलांतरण मुंबई उपनगरात करावे, आदिवासी विभागातील रिक्त पदे तत्काळ भरावीत आदी मागण्याही निवेदनात आहेत. निवेदनावर सुनील काळे, बापू पवार, संजय पवार, रवींद्र काळे, बापू काळे व आबा चव्हाण आदींच्या सह्य़ा आहेत.
जागतिक आदिवासी दिन
येथील आदिवासी कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवारी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील रायगड फंक्शन हॉलमध्ये या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे होते. डॉ. हंसराज उईके, विशाल सोनटक्के, सोलापूर आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी शेख यांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व प्रबोधन मेळावा घेण्यात आला. ‘बिरसा मुंडाने पुकारा है, भारत देश हमारा है,’ आदी घोषणाही विद्यार्थ्यांनी दिल्या.