केंद्र सरकारनं संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केलं असून, त्यावरून मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे. याच मुद्यावरून शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांनीही निशाणा साधला आहे. “सर्वपक्षीय संमतीविनाच जिथे कायदे लादले जात असलेल्या संसदेशिवाय संपूर्ण देश खुला झाला आहे,” असा टोला मातोंडकर यांनी लगावला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. केंद्राच्या अधिवेशन रद्द करण्याच्या निर्णयावरून आता टीका होऊ लागली आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सरकारला सवाल केला जात आहे.

शिवसेना नेत्या व अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनीही मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. “राज्यात निवडणुका घेण्यात आल्या. त्यासाठी प्रचंड मोठ्या सभा घेण्यात आल्या. सर्व पक्षांच्या चर्चेशिवाय जिथे कायदे लादले जात आहेत, ती संसद वगळता संपूर्ण देश खुला झाला आहे. खरोखरच खूप लोकशाही आहे. (टू मच डेमोक्रसी),” असं म्हणत ऊर्मिला मातोंडकर यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल; शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

काँग्रेसला पाठवलेल्या पत्रात केंद्रानं काय म्हटलं?

“करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता, हिवाळयाचे महिने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचे आहेत. करोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली. आता थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल,” असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं होतं.