गोवा एक्स्प्रेसने दहशतवादी प्रवास करत असल्याच्या संशयावरून गाडीमधील काही प्रवाशांची रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे काहीही संशयास्पद आढळून न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले. लोहमार्ग पोलिसांना मध्य प्रदेशातील खंडवा येथून गोवा एक्स्प्रेसच्या इंजिनपासून दुसऱ्या डब्यात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ही गाडी सकाळी ६.४५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर येण्यापूर्वीच पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गाडी येताच सर्वसाधारण डब्याची तपासणी करण्यात आली. लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, श्वानपथकासह उपस्थित होते. गाडीच्या सर्वसाधारण डब्यातून निवडक प्रवाशांची चौकशीही करण्यात आली. त्यांच्याकडे काहीही आढळून न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले. भुसावळ येथे कसून तपासणी झाल्यानंतरही त्याच डब्यातून रेल्वे पोलीस दलाचे अनिल नायडू आणि पंकज बांते या दोघांनी मनमाडपर्यंत प्रवास केला. मात्र त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही, अशी माहिती रेल्वे पोलीस सूत्रांनी दिली.