पूर्वीचे सरकार दुष्काळी स्थिती आहे असे म्हणायलाही घाबरत होते. पण आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊन लगेच दुष्काळ जाहीर करून त्याच्या निवारणाच्या कामाला सुरुवात केली आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विरोधकांना लगावला.

रयत क्रांती संघटनेच्या वतीने वारणा नगर जवळील कोडोली येथे शेतकरी, कष्टकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळाच्या कामाला राज्यशासनाने हात घातला असल्याचे सांगून शेतकरी हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचा निर्वाळा दिला.

राज्यातील दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला, शेतकऱ्यांना शासन पूर्णपणे मदत करणार आहे, अशी ग्वाही देऊन फडणवीस यांनी शासनावर याप्रश्नी टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. काही लोक वेड पांघरून पेडगावला निघाले आहेत. ते दुष्काळ सदृश शब्द वापरून लबाडी करत आहेत, असा टोला त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला. ते म्हणाले, पूर्वीच्या शासनाने शासन निर्णयाद्वारे दुष्काळ काळात टंचाई, सदृश्य असा घोळ घातला होता. आम्ही या शासन निर्णयात (जीआर) बदल केला. तुम्ही टंचाई म्हणत राहायचा पण आम्ही हिंमतीने दुष्काळ घोषित करून थेट उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे जे आपण करू शकलो नाही ते हे शासन कृतिशील पावले टाकत असल्याने यांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्यांनी दिशाभूल चालवली आहे, असा प्रहार त्यांनी केला.