जिल्ह्यात बुधवारी एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २७ वर पोहचली. आज निधन झालेली ६५ वर्षीय वृद्ध महिला उमरखेड तालुक्यातील खरूज येथील रहिवासी होती. दरम्यान, मारेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या एका रूग्णाने आज सकाळी पलायन केल्याने परिसरात खळबळ उडाली. तालुक्यातील कुंभा येथील हा रूग्ण पाच दिवसांपूर्वी उपचाररासाठी दाखल झाला होता.

जिल्ह्यात आज नव्याने ४६ पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली. यात ३० पुरुष व १६ महिला आहेत. त्यात दिग्रस शहरातील १३ पुरुष व पाच महिला, दिग्रस शहरातील संभाजी नगर येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील १० पुरुष व आठ महिला, झरी जामणी शहरातील तीन पुरुष, पुसद शहरातील एक पुरुष व दोन महिला, दारव्हा येथील अंबिका नगर येथील एक महिला आणि नेर शहरातील दोन पुरुषांचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षासह विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या २६ रूग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे आज स्वगृही पाठविण्यात आले.

जिल्ह्यात सक्रिय सकारात्मक रुग्णांची संख्या ३४४ वर पोहचली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ८९९ झाली आहे. यापैकी ५२८ बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. विलगीकरण कक्षात सध्या ८२ जण भरती आहे.

अंत्ययात्रेत सहभागी ६४ जण क्वारंटाइन

वणी येथील करोना हॉटस्पॉट ठरलेल्या तेली फैलातील एक करोनाबाधित महिला तालुक्यातील चिखलगाव येथील एका नातेवाईकाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्याची बाब पुढे आल्याने खळबळ उडाली. २२ जुलैला हा प्रकार घडल्यानंतर ही महिला २५ जुलै रोजी करोना पॉझिटिव्ह आढळली. मंगळवारी तिने आपण एका अंत्ययात्रेत सहभागी झालो होतो, अशी माहिती प्रशासनाला दिली. त्यामुळे प्रशासनाने या अंत्यविधीत सहभागी नागरिकांचा शोध घेऊन चिखलगाव, घोन्सा, कायर या गावांमधील ६४ लोकांना क्वारंटाइन कक्षात दाखल केले आहे. या सर्वांचे स्वॅब तपासणीकरीता पाठवण्यात आले आहेत.