08 March 2021

News Flash

पवारांचा वार: सही करताना लोकांचा हात लकवा लागल्याप्रमाणे थरथरतो!

‘‘आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीचे काम समजून त्यावर वेळेत निर्णय घेणे आवश्यक असते. विलासराव देशमुख यांच्याकडे हा गुण होता.

| September 11, 2013 02:13 am

‘‘आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीचे काम समजून त्यावर वेळेत निर्णय घेणे आवश्यक असते. विलासराव देशमुख यांच्याकडे हा गुण होता. आजच्या प्रशासनातील लोकांचा हात सही करताना लकवा लागल्याप्रमाणे थरथरतो! कामे मार्गी लागण्यासाठी फायलींवर महिनोंमहिने सहीच होत नसल्याचे दिसते. बरोबर जायचे आहे म्हणून आम्ही काही बोलत नाही!,’ असे मत व्यक्त करत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टोला लगावला.  
माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या जीवनावरील ‘आठवणीतले विलासराव’ या पुस्तकाचे मंगळवारी पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या विरोधात राज्यातील काँग्रेस नेत्यांची एक फळी नेहमीच आक्रमक राहिली आहे. विलासराव देशमुख हे यात आघाडीवर होते. याच विलासरावांचे कौतुक करताना पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उद्देशून हा टोला हाणला आहे.
‘त्या’ फायलींसाठी मुख्यमंत्र्यांवर नाराजी?
मुंबई : दोन-तीन महिने फाइली रखडण्यामागे सरकारच्या हाताला लकवा लागला की काय, अशी शंका व्यक्त करीत पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यामागे ‘विशिष्ट’ फाईली रखडल्याचे कारण असल्याची चर्चा आहे.
पवार यांनी अनेकदा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली. पण हाताला लकवा लागल्याची शंका व्यक्त करण्यापर्यंत मजल जावी यातच सारे आले, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे. काही विशिष्ट कंपन्यांना मदत करावी म्हणून मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला जात आहे. काही विशिष्ट फाईलींचा निपटारा व्हावा म्हणून काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीही घेतल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र प्रकरण सरळ नसल्याने मुख्यमंत्र्यांनी ही प्रकरणे मंजूर करण्यास नकार दिल्याचे समजते. राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसमधील काही नेते मुख्यमंत्र्यांवर  नाराज आहेत. त्याचाच संबंध पवार यांच्या विधानाशी जोडला जात आहे.
काही लोकांचा हात सही करताना लकवा लागल्याप्रमाणे थरथरतो! फायलींवर महिनोंमहिने सहीच होत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 2:13 am

Web Title: pawar snipes at cm for not signing important files
टॅग : Sharad Pawar
Next Stories
1 अन्नसुरक्षेत शेतकऱ्यांचा बळी नको : शेट्टी
2 नाशिकमध्ये पावसाचे जोरदार पुनरागमन
3 ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ची अधिसूचना काढण्यास विलंब
Just Now!
X