रायगड जिल्ह्यात महावितरणच्या बीलांमधील गोंधळ सुरुच आहे. टाळेबंदीमुळे तीन महिने देयके न देणाऱ्या महावितरण कंपनीने गेल्या महिन्यात भरमसाठ बील पाठवून ग्राहकांना शॉक दिला होता. आता मीटर रिडींग उपलब्ध नसल्याचे सांगून, अनेक ग्राहकांना शून्य युनीट वीज वापराची देयके पाठवली आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात दोन महिन्याच्या वाढीव बिलांचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांच्या माथी बसणार आहे.

महावितरण कंपनीने निसर्ग वादळाचे कारण पुढे करत या महिन्यात ग्राहकांना मिटर रिडींग उपलब्ध नसल्याचे कारण देत, शुन्य युनीट वीज वापराची देयके पाठवली आहेत. यामुळे पुढील महिन्यात वीज ग्राहकांना दोन महिन्याच्या एकूण वीज वापराचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

घरगुती ग्राहकांकडून त्यांनी वापरलेल्या युनिटच्या संख्यनुसार दर आकारणी केली जाते. पहिल्या १०० युनिटसाठी ३.४५ रुपये इतका दर आकारला जातो. तर १०१ ते ३०० युनिटसाठी ७.४३ रुपये इतका दर आकारला जातो. पुढील महिन्यात दोन महिन्यांताल वीज वापरानुसार देयकांची आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना २५ ते २६ टक्के वाढीव देयके येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. साधारपणे जेव्हा मीटर रिडींग उपलब्ध नसते, तेव्हा सरासरी देयकांची आकारणी केली जाते. मात्र निसर्ग वादळाचे कारण देत महावितरणने यंदा शून्य युनिट वीज देयके पाठवली आहेत. मात्र त्याच वेळी पुढील महिन्यात युनीटची विभागणी करून तसेच सरासरी देयकाचे समायोजन करून वीज बील आकरणी केली जाणार असल्याचे मॅसेज महावितरण ग्राहकांना पाठविले जात आहेत.

‘साधारणपणे जेव्हा मीटर रिडींग उपलब्ध नसते तेव्हा सरासरी देयके दिली जातात. पण तसे न करता महावितरणने शून्य युनिट दाखवून ग्राहकांना देयके पाठविली गेली आहेत. आता पुढील महिन्यात दुप्पट बील पाठवून त्यांची वसूली केली जाणार आहे. किमान ग्राहकांना सरासरी देयके द्यायला हवीत. म्हणजे पुढील महिन्यात दुप्पट भरणा करावा लागणार नाहीय’

संजय राऊत, ग्राहक

‘ महावितरण मनमानी पद्धतीने काम करीत आहे. त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे. टाळेबंदीनंतर भरमसाठ बील पाठविण्यात आली. आता शुन्य वापर असल्याची सांगून देयके दिली. पुढील महिन्यात पुन्हा वाढीव देयके आकरली जातील. वेळेत रिडींग घेणे आणि त्याची योग्य देयके देणे महावितरणची जबाबदारी आहे. ती ते योग्य पद्धतीने पाळत नाहीत. यामुळे ग्राहकांना भुर्दंड बसतो.’

– मंगेश माळी, अध्यक्ष जनजागृती ग्राहक मंच